लोकनेते सदाशिवराव मंडलिक जयंती लेख... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकनेते सदाशिवराव मंडलिक जयंती लेख...
लोकनेते सदाशिवराव मंडलिक जयंती लेख...

लोकनेते सदाशिवराव मंडलिक जयंती लेख...

sakal_logo
By

लोकनेते, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक जयंती ...

प्रेरणादायी लोकनेता

आज ७ ऑक्टोबर दिवंगत लोकनेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा ८८ वा जयंती दिवस. सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साही आणि प्रेरणादायी दिवस. निवडणुका आणि साहेब समीकरणच और होते. निवडणुका म्हटले की मंडलीकसाहेबांना प्रचंड ऊर्जा यायची. इलेक्शन फिवरमध्ये ‘मंडलिकसाहेब असायला हवे होते!’ हेच उद्गार प्रत्येक राजकारणी, कार्यकर्ता आणि सामान्य माणसाच्या तोंडी असते. त्यामुळेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मंडलिकसाहेबांची आठवण ही नक्कीच येत राहणार आहे. ५० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीनंतर हयात नसतानाही निवडणुकीमध्ये मंडलिक साहेबांचा ब्रँड अनेकजण वापरत आहेत. हा करिश्मा कुठल्याही राजकारण्याच्या नशिबी असेल असे वाटत नाही. आज ८८ व्या जयंतीदिनी त्यांच्या चरणी वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
निवडणुका म्हटलं की साहेबांना अनोखी उर्जा असायची. विधानसभा, लोकसभा असो किंवा ग्रामपंचायत, सोसायटी किंवा दूध डेअरीच्या निवडणुका असो. साहेबांच्या वेळी माहोलच वेगळा असायचा. ''जनमत जाणून घेण्यासाठी मतदान हे व्हायलाच पाहिजे. निवडणुकीच्या वातावरणात उमेदवाराला मतदारांपुढे भूमिका मांडता आली पाहिजे. कार्यकर्तृत्वाची धमक असणारा योग्य प्रतिनिधी पारख करून निवडला पाहिजे. '' हा मंडलिकसाहेबांचा आग्रह असायचा. तुमची भूमिका जनतेपुढे मांडत राहा, लढत राहा. जनतेला पटलं तर लोकप्रतिनिधीत्व देतील. पण जनतेवर नेतृत्व लादता कामा नये. ''आंबा आढीतच पिकला पाहिजे, तो बुक्क्या मारून पिकवता येत नाही ! '' असे ते नेहमी म्हणायचे. पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कै. मंडलिकसाहेब कोणत्याही सभागृहात कधीच मागच्या दाराने लोकप्रतिनिधी झाले नाहीत. प्रत्येक निवडणूक त्यांनी झगडून व संघर्ष करून जिंकली.
२००९ची लोकसभेची ऐतिहासिक निवडणूक तर जिल्ह्यातील साऱ्या नेत्यांना जमिनीवर आणणारी ठरली. जनतेला गृहीत धरून सारे दिग्गज नेते एका बाजूला आणि मंडलिक साहेबांच्या मागे सारी जनता. या निवडणूक निकालाने ''जनतेला नेत्यांनी कधी गृहीत धरून चालू नये, '' असा अनोखा संदेश दिला. एकांडा शिलेदार असणाऱ्या साहेबांनी जिंकलेली ही निवडणूक अफलातून ठरली. साहेब म्हणायचे, '' आपण पेरायचं काम करूया. पीक हाती येईल न येईल ! पण जनतेमध्ये आपण भूमिका मांडत राहायचे. जनतेला पटलं तर जनता आपल्या पाठीशी राहील. नाही पटलं तर, कधीतरी तुमची भूमिका जनतेला समजून आल्यावर जनता आपोआप तुमच्या पाठीशी राहील.’ अनेकवेळा राजकीय विजनवास सोसूनही चिकाटी त्यांनी कधी सोडली नाही. तब्येत खालावल्यानंतरही ‘दवाखान्यातून कधी एकदा बाहेर पडतो आणि माझी जनता मला कधी भेटेल’ यासाठी त्यांची धडपड असायची. उपचारानंतर बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर मंडलिक साहेब एकदा साखर कारखान्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हमिदवाडा कार्यस्थळावर जनतेसमोर आले. समोर जनसमुदाय पाहताच साहेबांचे डोळे अश्रुंच्या धारांनी डबडबले. जनतेला भेटण्याची ही त्यांची आस असल्यामुळेच कार्यकर्ता, जनता आणि मंडलिकसाहेब यांच्या जिवा- शिवाचे नाते होते. म्हणूनच तर साहेब नेहमी म्हणायचे जनताही हेच माझे टॉनिक आहे. प्रामाणिकपणे जनतेच्या सुखदु : खात सहभागी होऊन तळमळीने समाजकार्य करणे आणि जनतेसाठी अधिकाधिक वेळ खर्ची करणे हीच साहेबांच्या स्मृतीला खरी आदरांजली ठरेल.