
जीवनात आध्यात्मिक उन्नती होणे आवश्यक परमात्मराज महाराज: आडी मल्लया येथे पौर्णिमेनिमित्त प्रवचन :
04284
आध्यात्मिक उन्नती होणे आवश्यक
परमात्मराज महाराज; आडी मल्लयात पौर्णिमेनिमित्त प्रवचन
म्हाकवे, ता. ८ ः वाईट कर्माचे फळ वाईट मिळते. तर पुण्याचे फळ सौख्यरूपाने मिळतच असते. भौतिक उन्नती कमी झाली तरी चालेल; मात्र आध्यात्मिक उन्नती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.
आडी-मल्लया संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठातर्फे पौर्णिमेनिमित्त प्रवचनात ते बोलत होते. यावेळी श्री दत्तगुरु चरणी अभिषेक अर्पण करून महाआरती झाली.
परमपूज्य परमात्मराज महाराज म्हणाले, ‘चांगले विचार, चांगल्या व्यक्तीच्या सान्निध्याला महत्त्व आहे. वाईट वागून किंवा इतरांचे शाप, तळतळाट घेऊ नये. चांगल्या कर्माने चांगलेच होणार असते. दुसऱ्याला हानी पोचवून चांगले होणार नाही. भौतिक गोष्टींची हाव असल्याने लोक वाईटाकडे वळतात.’ भगवान मगदूम यांनी महाप्रसादाची सोय केली. यावेळी राजस्थानचे सियारामगिरीजी महाराज, मनोहर नाथजी महाराज यांचा परमात्मराज महाराज यांनी सत्कार केला. उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, रूपाली बनछोडे, पैलवान तृप्ती गुरव, बापूसाहेब पाटील, प्रा. तात्यासाहेब मोरे, संतोष कुंभार यांचा सन्मान झाला. कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यातील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.