
कोतोली फाटा ते नांदारी रस्ता रुंदीकरण काम बंद पाडण्याचा इशारा
B02864
माजगाव ः मंडलाधिकारी सतीश ढेंगे यांना निवेदन देताना शेतकरी.
------------------
रुंदीकरण भरपाईसाठी
काम बंद पाडण्याचा इशारा
कोतोली फाटा-नांदारी मार्ग; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
माजगाव, ता. १० ः कोतोली फाटा ते नांदारीदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. रुंदीकरणावेळी शेतकऱ्यांची शेतजमीन रूंदीकरणात गेली आहे. कोणतीही सूचना न देता काम सुरू आहे. रस्त्याकडेची अनेक झाडे विनापरवानगी तोडली जात आहेत. पिकांचे नुकसानही झाले आहे. नुकसानीची भरपाई मिळावी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला. कोतोलीत रास्ता रोको करून जिल्हाधिकारी, कोतोलीचे मंडलधिकारी सतीश ढेंगे यांना निवेदनही दिले.
रस्त्याकडेच्या जमिनी काही शेतकऱ्यांनी घरे बांधण्यासाठी जादा दराने विकत घेतल्या आहेत. बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेतकऱ्यांनी शेताच्या हद्दीवर लावलेल्या झाडांची विनापरवाना कत्तल करून परस्पर झाडांची विल्हेवाट लावली जात आहे. रुंदीकरणात हातातोंडाशी आलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने नुकसानीची त्वरित भरपाई द्यावी; अन्यथा रस्ता रुंदीकरणाचे काम बंद पाडू, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी दिलीप कळेकर, बाबासो साळोखे, सरदार जाधव, मनोहर खोत, युवराज पाटील, पोपट पाटील, बळवंत चौगले, राहुल पाटील, प्रकाश पाटील, अमोल सातपुते सुधीर हांडे आदी शेतकरी उपस्थित होते.