
बांबवडे येथील बिल्डरची ५ कोटीची फसवणूक
खोटे दस्तऐवज करून बिल्डरची
भागीदारांकडून ५ कोटींची फसवणूक
शाहूवाडी, ता. २८ : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील त्रिवेणी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स लि. कंपनीच्या चार संचालकांनीच मुख्य बिल्डर प्रवीण रामराव घाडगे यांची खोटे दस्तऐवज, खोटा कंपनी ठराव व खोट्या सह्या करून त्याद्वारे प्लॉट विकून सुमारे ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बिल्डर प्रवीण घाडगे यांची शाहूवाडी पोलिसांत दिली आहे. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, तक्रारदार बिल्डर प्रवीण घाडगे व त्यांचे मित्र अमित जाधव, हरिश साळुंखे, राम गायधर व रवींद्र खाडे (सर्व रा. कोल्हापूर) यांनी २०१४ मध्ये त्रिवेणी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा.लि.कंपनीची स्थापना केली. कंपनीने बांबवडे येथे गट नंबर ३६ येथे गृह प्रकल्प केला. त्यामध्ये १५ जून २०१७ रोजी अमित जाधव, हरिश साळुंखे, राम गायधर, रविंद्र खाडे यांनी कंपनीचा खोटा ठराव, खोटे दस्तऐवज तयार करून व बिल्डर घाडगे यांच्या खोट्या सहंया करून संगनमताने कंपनीचे फ्लॅट, दुकान गाळे, ऑफिसेस ग्राहकांना दस्तऐवज करून दिले. त्यातून जमा झालेली रक्कम घाडगे यांना न देता सुमारे ५ कोटींची आर्थिक फसवणूक केली. याबाबतची तक्रार घाडगे यांनी पोलिसांत दिली. पोलिस उपनिरीक्षक प्रियांका सराटे अधिक तपास करत आहेत.