
मुख्य बाजारपेठ नो पार्किंग झोन
मुख्य बाजारपेठ नो पार्किंग झोन
मलकापुरात निर्णय; अतिक्रमणेही काढणार, व्यापाऱ्यांसह बैठक
मलकापूर, ता. २२ : येथील विठ्ठल मंदिर ते नगरपालिका या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर असणारी अतिक्रमणे काढावीत आणि हा मार्ग नो पार्किंग झोन ठेवावा, अशा निर्णय येथील व्यापारी, नागरिक व पालिका प्रशासन यांच्यात झाला. येथील बाजार पेठेतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढणेसाठी आज येथील नरहर मंदिरात पालिका प्रशासनाने व्यापारी व नागरिकांची बैठक बोलावली होती. त्यावेळी हा निर्णय झाला. मात्र आजच्या बैठकीस नागरिक व व्यापाऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
या वेळी बैठकीत नो पार्किंग झोन करावा, व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यावे, रस्त्यावर पट्टे मारल्यास नियम पाळावेत, रस्त्यावरची दुकानापुढील पाले काढावीत, बँका व इतर संख्यांनाही याबाबत कळवावे, अशा मुद्यांवर चर्चा झाली. त्यावर नागरिक व व्यापारी यांनी सुचना मांडल्या. अखेर विठ्ठल मंदिर ते नगरपालिका या बाजारपेठेतील मुख्य रस्यावरील अतिक्रमित दुकानासमोरील पाले आठवडाभरात काढावीत, हा मार्ग नो पार्किंग झोन करावा. नागरिक व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनास सहकार्य करावे. खासगी वाहने पार्किंगची व्यवस्था ज्याची त्याने करावी, पालिका प्रशासनाने दुजाभाव न ठेवता नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी आदींबाबत सर्वानुमते निर्णय झाले. नियम मोडून कोणी वाहने लावलेस त्या वाहनांनवर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी बैठकीत काहींनी केली. त्यावर असा कोणताही दंड नगरपालिका वसूल करू शकत नाही, असे मुख्याधिकारी कदम यांनी स्पष्ट केले.
बैठाकीस मुख्याधिकारी विद्या कदम, प्रकाश पाटील, प्रवीण प्रभावळकर, महेंद्र कोठावळे, राजेंद्र देशमाने, विजय गांधी, सुशांत तांदळे, विकास देशमाने, केतन गुजर, बंडू कोठावळे, रूपेश वारंगे, सुभाष कोळेकर यांच्यासह नागरिक, व्यापारी उपस्थित होते.
------------
चौकट
बैठक फार्स ठरू नये
बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील दुकांनांनसमोर असणारी अतिक्रमणे काढणेसाठी आठवडाभराचा दिलेला वेळ, त्यानंतर पालिका प्रशासनास रस्त्यावर मापे टाकून पट्टे मारण्यासाठी लागणारा कालावधी आणि येणारे पावसाळ्याचे दिवस पाहता आजची बैठक यापूर्वीच्या बैठकांसारखीच केवळ फार्स ठरू नये, अशी चर्चा बैठकीच्या ठिकाणी होती.