पंजाब - गुजरात आयपीएल सामना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंजाब - गुजरात आयपीएल सामना
पंजाब - गुजरात आयपीएल सामना

पंजाब - गुजरात आयपीएल सामना

sakal_logo
By

पंजाब किंग्जला
विजयाचा बूस्टर

आघाडीवर असलेल्या गुजरातचा दुसरा पराभव

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः कागिसो रबाडाची (४/३३) पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी आणि शिखर धवनच्या (नाबाद ६२ धावा) दमदार अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने येथे पार पडलेल्या आयपीएल लढतीत आघाडीवर असलेल्या गुजरात टायटन्सवर ८ गडी व २४ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. पंजाब किंग्जने पाचव्या विजयासह आपल्या आव्हानाला बळकटी दिली. आठ विजय संपादन करणाऱ्या गुजरात टायटन्सला मात्र दुसऱ्यांदाच पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली. गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम असून पंजाब किंग्जने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.
गुजरातकडून मिळालेल्या १४४ या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाब किंग्जची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शमीने जॉनी बेअरस्टोला १ धावेवरच प्रदीप सांगवानकरवी झेलबाद केले. त्यानंतर मात्र शिखर व भनुका राजपक्ष या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी करताना पंजाब किंग्जच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. भनुकाने २८ चेंडूंत ४० धावांची खेळी केली. ही खेळी त्याने ५ चौकार व १ षटकाराने सजवली. लॉकी फर्ग्युसनने भनुकाला पायचीत बाद करीत जोडी तोडली. त्यानंतर शिखर व लियाम लिव्हींगस्टोन या जोडीने पंजाब किंग्जच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, याआधी गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिद्धीमान साहाने २१ धावांची खेळी केली. त्यानंतर मात्र साई सुदर्शन वगळता गुजरातच्या इतर फलंदाजांना आपला ठसा उमटवता आला नाही. शुभमन गिल (९ धावा), हार्दिक पंड्या (१ धाव), डेव्हिल मिलर (११ धावा), राहुल तेवतिया (११ धावा) यांच्याकडून निराशा झाली.
एका बाजूने इतर फलंदाज अपयशी ठरीत असताना सुदर्शनने मात्र दुसऱ्या बाजूने ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ६५ धावांची खेळी केली. रबाडाने ३३ धावा देत ४ फलंदाजांना बाद केले. अर्शदीप सिंग, ॠषी धवन, लियाम लिव्हींगस्टोन यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.

लिव्हींगस्टोनकडून शमीच्या एका षटकात २८ धावा
पंजाबसमोर ५ षटकांमध्ये विजयासाठी २७ धावांची आवश्‍यकता होती. हार्दिक पंड्याने १६वे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमीकडे चेंडू सोपवला. लियाम लिव्हींगस्टोन याने या षटकात चक्क २८ धावा वसूल करीत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने या षटकात ६,६,६,४,२,४ अशाप्रकारे धावांची वसूली केली. लिव्हींगस्टोन अवघ्या १० चेंडूंत नाबाद ३० धावांची फटकेबाजी केली. या खेळीत त्याने २ चौकार व ३ षटकार मारले. शिखर ६२ धावांवर नाबाद राहिला. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार व १ षटकार फटकावले.

संक्षिप्त धावफलक ः गुजरात टायटन्स - २० षटकांत ८ बाद १४३ धावा (रिद्धीमान साहा २१ - १७ चेंडू, ३ चौकार, १ षटकार, साई सुदर्शन ६५ - ५० चेंडू, ५ चौकार, १ षटकार, कागिसो रबाडा ४/३३, अर्शदीप सिंग १/३६, ॠषी धवन १/२६, लियाम लिव्हींगस्टोन १/१५) पराभूत वि. पंजाब किंग्ज १६ षटकांत २ बाद १४५ धावा (शिखर धवन नाबाद ६२ - ५३ चेंडू, ८ चौकार, १ षटकार, भनुका राजपक्ष ४० - २८ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, लियाम लिव्हींगस्टोन नाबाद ३० - १० चेंडू, २ चौकार, ३ षटकार, मोहम्मद शमी १/४३, लॉकी फर्ग्युसन १/२९).

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81065 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top