
बंगळूर - चेन्नई सामना बातमी
चेन्नईचे आव्हान संपुष्टात येण्याच्या मार्गावर
बंगळूरची सहाव्या विजयासह चौथ्या स्थानी झेप
पुणे, ता. ४ ः गतविजेत्या चेन्नई सुपरकिंग्जचे आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आव्हान आता संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने बुधवारी त्यांच्यावर १३ धावांनी विजय मिळवला. चेन्नई सुपरकिंग्जचा हा सातवा पराभव ठरला. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने सहाव्या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना उभारलेल्या १७३ धावांची यशस्वीपणे राखण करून बंगळूरने चेन्नईला पराभवाचा झटका दिला. २० षटकांत चेन्नईला ८ बाद १६० धावांपर्यंत मजल मारता आली.
काही सामन्यात गोलंदाजांना साथ देणाऱ्या पुण्याच्या खेळपट्टीने चेन्नई विरुद्ध बंगळूर या महत्त्वाच्या सामन्याकरिता स्वभाव बदलला. फलंदाजीला साथ देण्याचा अंदाज लावून कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. चांगल्या लयीत नसलेल्या विराट कोहलीला सलामीचा फलंदाजी करायची संधी संघ व्यवस्थापन देत आहे. कोहली त्याचा फायदा लयीत येण्याकरिता घेत असला तरी त्याचा विपरीत परिणाम संघाच्या धावगतीवर होत आहे. बुधवारच्या सामन्यात कोहलीने धावा जमा करायला वेळ घेतला. कप्तान फाफ डु प्लेसिस बरोबर चांगली भागीदारी केल्याचे आकडे दिवत असले तरी वेग गेल्याचेही चित्र लपत नव्हते.
कोहली धावा जमा करायला झगडत असताना डु प्लेसिसने चांगले टोले लगावले. २२ चेंडूत ३८ धावा करताना त्याने ४ चौकार १ षटकार मारला. त्या उलट कोहलीला ३० धावा करायला ३३ चेंडू लागले. धावगती वाढवायला मॅक्सवेलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले गेले, जी चाल अयशस्वी ठरली. मॅक्सवेल लगेच बाद झाल्यावर महीपाल लामलोरने जबरदस्त फटकेबाजी केली. लामलोर आणि दिनेश कार्तिकने मोठे फटके मारल्याने बंगळूरला २० षटकांत ८ बाद १७३ धावा जमा करता आल्या. माहीश थिकशानाने किफायतशीर मारा करताना ३ फलंदाजांना बाद केले.
चेन्नईच्या डावाची सुरुवात बऱ्यापैकी चांगली झाली. गेल्या सामन्यात १८०पेक्षा जास्त धावांची सुरुवात करून देणाऱ्या कॉनवे - ऋतुराज गायकवाडने अर्धशतकी सलामी दिली. २१ हजार प्रेक्षक जास्त करून चेन्नई संघाला पाठिंबा देताना दिसले. स्थानिक खेळाडू ऋतुराज गायकवाड आणि महेंद्रसिंह धोनीचे चाहते ओरडत चेन्नई संघाला प्रोत्साहन देत होते. जम बसला वाटत असताना ऋतुराज बाद झाला. कॉनवे एका बाजूने चांगला खेळत असताना बंगळूरच्या गोलंदाजांनी दुसऱ्या बाजूने रॉबीन उत्थप्पा, अंबाती रायुडू आणि जडेजाला जम बसू न देता बाद केले.
१७३ धावांची राखण करायला धावा रोखून नव्हे तर फलंदाजांना बाद करून दडपण वाढवता येणार होते. नेमके तेच बंगळूरच्या गोलंदाजांनी केले. मारा करताना चेंडूचा वेग शिताफीने बदलून फलंदाजाला गोंधळात टाकणाऱ्या हर्षल पटेलने जडेजा आणि मोईन अली बाद करून बंगळूरला सामन्यात परत आणले. शेवटच्या दोन षटकात ३९ धावा काढणे सोपे नव्हते. एकमेव आशा धोनीवर असताना हेझलवुडने १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धोनीला बाद करून सामना बंगळूरकडे खेचला. हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकात १७ धावा निघूनही हाती आलेली पकड घट्टं पकडून बंगळूरने सामना १३ धावांच्या फरकाने जिंकून बाद फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.
संक्षिप्त धावफलक ः रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - २० षटकांत ८ बाद १७३ धावा (विराट कोहली ३०, फाफ ड्युप्लेसिस ३८, महिपाल लोमरोर ४२, दिनेश कार्तिक नाबाद २६, माहीश थिकशान ३/२७, मोईन अली २/२८) विजयी वि. चेन्नई सुपरकिंग्ज २० षटकांत ८ बाद १६० धावा (ॠतुराज गायकवाड २८, डेव्होन कॉनवे ५६, मोईन अली १३४, हर्षल पटेल ३/३५, ग्लेन मॅक्सवेल २/२२).
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81213 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..