मंबई विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंबई विजय
मंबई विजय

मंबई विजय

sakal_logo
By

मुंबईने चेन्नईचेही आव्हान संपवले
प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर; धोनीचा संघ नवव्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सने कमी धावसंख्येच्या सामन्यात चेन्नईचा पराभव केला आणि आपल्यासह चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या संघाचेही आव्हान यंदाच्या आयपीएलमधून संपुष्टात आणले.
आता मुंबईसह चेन्नईही प्लेऑफ गाठणार नाही, हे स्पष्ट झाले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून चेन्नईचा डाव ९७ धावांत संपुष्टात आणला आणि त्यानंतर हे आव्हान १४.५ षटकांत पूर्ण केले; परंतु त्यासाठी पाच फलंदाज गमावले.
या माफक आव्हानासमोर मुंबईची अवस्था ४ बाद ३३ अशी झाली होती. बाद झालेल्या या फलंदाजात रोहित शर्मा, इशान किशन यांचा समावेश होता. त्यामुळे ९८ धावा करणे मुंबईला कठिण जाणार असे चित्र होते.
तिलक वर्मा (नाबाद ३५) आणि हृतिक शोकीन (१८) यांनी डाव सावरला. त्यानंतर टीम डेव्हिडने सात चेंडूत १६ धावांचा तडाखा देत मुंबईला विजय मिळवून दिला.
या विजयानंतर मुंबई अखेरच्या स्थानावर कायम राहिले, तर चेन्नई नवव्या क्रमांकावर कायम आहेत.
केवळ प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळत असलेल्या मुंबईच्या गोलंदाजांनी यंदाच्या मोसमात प्रथमच इतकी प्रभावी सुरुवात केली. डॅनियल सॅम्सने तर पहिल्याच षटकातील पहिल्या चार चेंडूत कॉन्वे आणि मोईन अली यांना बाद केले. याच सॅम्सने ऋतुराज गायकवाडला माघारी धाडले. त्याअगोदर बुमारने उथप्पाला पायचीत टिपले. त्यामुळे चेन्नईची अवस्था ५ बाद ३९ अशी झाली होती.
एरवी अखेरच्या काही षटकांत फलंदाजीस येणारा महेंद्रसिंग धोनीवर प्रथमच पॉवर प्लेमध्ये फलंदाजीस येण्याची वेळ आली. एकीकडे इतर फलंदाज बाद होत असताना धोनी मात्र शानदार फलंदाजी करत होता. ३६ धावा करताना त्याने चार चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटी तो नाबाद राहिला.
चेन्नईचा डाव १६ षटकांत संपुष्टात आला. त्यांनी केलेल्या ९७ धावांत अवांतर १५ धावांचा समावेश आहे.

बत्ती गुलमुळे डीआरएस नाही
नाणेफेक सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर विद्युत प्रकाशझोतातील एका टॉवरची वीज गेली होती. त्याचा परिणाम डीआरएसच्या प्रणालीवर झाला. परिणामी सुरुवातीला काही षटकांत हे तंत्रज्ञान बंद होते. त्याचा फटका कॉन्वेला बसला. पायचीतचा निर्णय तो डीआरएस घेऊ शकला नाही.

वाढदिवशी पोलार्डला वगळले
१२ मे हा कायरन पोलार्डचा वाढदिवस. एरवी मुंबई संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असलेल्या पोलार्डचा फॉर्म पूर्णपणे हरपलेला आहे. आज अखेर त्याला वगळण्यात आले; परंतु त्याच्याऐवजी संधी देण्यात आलेला नवोदित त्रिस्तान स्टब्स भोपळाही न फोडता बाद झाला.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई ः २० षटकांत सर्वबाद ९७ (ऋतुराज गायकवाड ७, कॉन्वे ०, मोईन अली ०, रॉबीन उथप्पा १, अंबाती रायडू १०, महेंद्रसिंग धोनी नाबाद ३६ -३३ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, अवांतर १५, डॅनियल सॅम्स ४-०-१६-३, जसप्रीत बुमरा ३-१-१२-१, रिले मेर्डित ३-०-२७-२, कुमार कार्तिकेय ३-०-२२-१) पराभूत वि. मुंबई ः १४.५ षटकांत ५ बाद १०३ (इशान किशन ६, रोहित शर्मा १८, तिलक वर्मा नाबाद ३४, हृतिक शोकीन १८, टीम डेव्हिड नाबाद १६, मुकेश चौधरी ४-०-२३-३, सीरमजीत सिंग ४-०-२२-१)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82149 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top