
कोलकाताचा विजय
कोलकताच्या आशा कायम
हैदराबाद संघावर एकतर्फी विजय
सुनंदन लेले- सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ ः आंद्रे रसेलची अष्टपैलू कामगिरी आणि सॅम बिलिंग्ज आक्रमक फलंदाजी यामुळे कोलकताने हैदराबादचा ५४ धावांनी पराभव करून आयपीएलमध्ये प्लेऑफ गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवल्या. सरासरीही उंचावणारा कोलकता संघ आता सहाव्या स्थानावर आहे.
प्रथम फलंदाजी करताना कोलकताने ६ बाद १७७ धावा केल्या त्यानंतर हैदराबादला ८ बाद १२३ धावांत रोखले.
श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. व्यंकटेश अय्यर लवकर बाद झाल्यावर अजिंक्य रहाणे - नितीश राणा जोडीने डाव स्थिरावला. चांगली फटकेबाजी करू लागलेला राणा २६ धावा काढून बाद झाला तर रहाणे २८ धावा करून तंबूत बाद होऊन परतला. वेगवान मारा करण्यात तरबेज असलेल्या उमरान मलिकने शनिवारच्या सामन्यातही तिखट मारा केला आणि तीन फलंदाजांना बाद केले.
श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग लवकर बाद झाल्यावर सॅम बिलींग्जने सावध खेळ केला. नेहमी हाणामारीकरता प्रसिद्ध असलेल्या आंद्रे रसेलने परिस्थितीची गरज ओळखून चांगली फलंदाजी केली. दोघांनी भागीदारी ६३ धावांची रचली. धावसंख्या कमी होत आहे असे वाटत असताना वॉशिंग्टन सुंदरने टाकलेल्या शेवटच्या षटकात रसेलने तीन षटकार मारले.
हैदराबादकडून अभिषेक शर्माचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली. रसेलने तीन तर साऊदीने दोन विकेट मिळवल्या.
संक्षिप्त धावफलक
कोलकता ः २० षटकांत ६ बाद १७७ (अजिंक्य रहाणे २८, नितीश राणा २६, सॅम बिलिंग ३४, आंद्रे रसेल नाबाद ४९ -२८ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, उमरान मलिक ४-०-३३-३) वि. वि. हैदरबाद ः २० षटकांत ८ बाद १२३ (अभिषेक शर्मा ४३ -२८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, एडन मार्करम ३२, टीम साऊदी ४-०-२३-२, आंद्रे रसेल ४-०-२२-३)
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82294 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..