भारत डाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत डाव
भारत डाव

भारत डाव

sakal_logo
By

रिषभ पंतचा शतकी उलटवार
जडेजासह द्विशतकी भागीदारी, भारताची त्रिशतकी मजल
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा
बर्मिंगहॅम, ता. १ ः परिस्थिती कशीही असो बचावापेक्षा आक्रमण हाच योग्य पर्याय असतो, हे सूत्र रिषभ पंतने तयार केले आहे आणि ते त्याने पुन्हा सिद्धही करून दाखवले. १११ चेंडूत १४६ धावांचा झंझावात सादर केला. रवींद्र जडेजासह द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर ७ बाद ३३८ अशी मजल मारली. ५ बाद ९८ अशा संकटात सापडल्यानंतर भारताने ही प्रगती केली.
निम्मां संघ माघारी फिरलेला असताना रिषभ पंतने त्याच्या खास धाडसी शैलीत सकारात्मक फलंदाजी करून ८९ चेंडूतच शतक झळकावले. पंतने रवींद्र जडेजा सोबत षटकामागे जवळपास साडेपाचची सरासरी राखत सहाव्या विकेटसाठी २२२ अमूल्य भागीदारी रचली. दिवस अखेर नाबाद ८३ धावांवर नाबाद राहिला.
काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमरा बर्मिंगहॅमच्या बुलरींग शॉपिंग मॉलमध्ये आरामात फिरत होता, तोच बुमरा गुरुवारपासून काहीसा गंभीर झाला आणि तोच ब्लेझर घालून एजबस्टन मैदानावर भारतीय क्रिकेट इतिहासातला ३६ कसोटी कर्णधार म्हणून नाणेफेकीला आलेला दिसला. भारतीय संघ व्यवस्थापनाने अश्विनला जागा न देताना वातावरणाचा विचार करून शार्दूल ठाकूरचा समावेश केला. सलामीला शुभमन गिलसोबत चेतेश्वर पुजारा आला. अँडरसनने गिलला चूक करायचा भाग पाडले. अ‍ॅडरसननेच गिल आणि पुजाराला बाद केले.
उपहाराअगोदर नेमकी पावसाने एजबस्टन मैदानावर हजेरी लावली. खेळाचा पाऊण एक तास वाया गेला. उपहारानंतर पॉटने दोन फलंदाजांना बाद केले. त्याने अगोदर हनुमा विहारीला पायचीत केले. त्यानंतर चांगला खेळू लागला वाटत असताना विराट कोहली बाहेर जाणारा चेंडू सोडताना बाद झाला. चेंडूने बॅटची आतली कड घेऊन स्टंपचा वेध घेतला. ११ धावांवर बाद होणाऱ्‍या कोहलीच्या अपयशाची कहाणीपुढे सुरू राहिली.
गोलंदाजाला डोक्यावर न घेता फलंदाजी करायचा पंतची शैली सगळ्यांना माहीत होती. अँडरसनलाही पुढे सरसावत खेळणे पंतने सुरू केल्यावर प्रेक्षकांची करमणूक व्हायला लागली. पंतने गोलंदाजांची लय बिघडवताना काहीसा धोका पत्करून खेळ केला. त्याच्या फलंदाजीत धाडस होते तसेच सकारात्मकता होती. पंत आणि रवींद्र जडेजाने प्रत्येक खराब चेंडूवर धावा वसूल करत शतकी भागीदारी रचल्याने गेलेला तोल सावरला.

दृष्‍टिक्षेपात
आशियाबाहेर भारतीयांकडून वेगवान शतक
- ७८ चेंडू वीरेंद्र सेहवाग वि. विंडीज २००६
- ८८ चेंडू, अझरुद्दीन वि. इंग्लंड (लॉर्डस) १९९०
- ८९ चेंडू, रिषभ पंत वि. इंग्लंड (एजबास्टन) २०२२
आशियाबाहेर शतक करणारे भारतीय यष्टीरक्ष
- रिषभ पंत ः ४
- इतर तीन शतके (विजय मांजरेकर, अजय रात्रा आणि वृद्धिमन साहा)

संक्षिप्त धावफलक ः भारत, पहिला डाव ः ७३ षटकांत ७ बाद ३३८ (शुभमन गिल १७, चेतेश्वर पुजारा १३, हनुमा विहारी २०, विराट कोहली ११, रिषभ पंत १४६ -१११ चेंडू, १९ चौकार, ४ षटकार, श्रेयस अय्यर १५, रवींद्र जडेजा खेळत आहे ८३, शार्दुल ठाकूर १, अँडरसन ५२-३, पॉट ८५-२)

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g87539 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..