दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (महिला टी-२० विश्‍वकरंडक) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (महिला टी-२० विश्‍वकरंडक)
दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (महिला टी-२० विश्‍वकरंडक)

दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत (महिला टी-२० विश्‍वकरंडक)

sakal_logo
By

महिला टी-२० विश्‍वकरंडक

यजमान दक्षिण आफ्रिका
पहिल्यांदाच अंतिम फेरीत
माजी विजेत्या इंग्लंडचे आव्हान संपुष्टात
केपटाऊन, ता. २४ ः यजमान दक्षिण आफ्रिकन महिला संघाने शुक्रवारी येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत माजी विजेत्या इंग्लंड संघावर ६ धावांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदाच टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता येत्या रविवारी जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकन संघासमोर पाच वेळा विश्‍वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका व नदीन क्लार्क यांनी प्रभावी कामगिरी करीत इंग्लंडच्या फलंदाजांना बांधून ठेवले. डॅनी वॅटने ३४ धावांची, सोफीया डंकले हिने २८ धावांची, नॅट सीव्हर हिने ४० धावांची आणि कर्णधार हेथर नाईट हिने ३१ धावांची खेळी साकारली. पण यापैकी कुणालाही खेळपट्टीवर उभे राहून इंग्लंडला विजय मिळवून देता आला नाही. अयाबोंगा खाका हिने अव्वल दर्जाची गोलंदाजी करताना २९ धावा देत ४ फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शबनीम इस्माईल हिने २७ धावा देत ३ फलंदाज बाद केले.
लॉरा, ब्रिटस्‌ यांची दमदार अर्धशतके
दरम्यान, याआधी दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॉरा वोलवॉर्डट्‌ व ताझमिन ब्रिटस्‌ या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी करताना संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. लॉराने ४४ चेंडूंमध्ये ५३ धावांची, तर ब्रिटस्‌ हिने ५५ चेंडूंत ६८ धावांची खेळी साकारली. लॉराने आपल्या खेळीत ५ चौकार व १ षटकार मारले. ब्रिटस्‌ हिने सहा चौकार व दोन षटकारांनी आपली खेळी सजवली. दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ४ बाद १६४ धावा फटकावल्या. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन हिने २२ धावा देत तीन फलंदाजांना बाद केले.

संक्षिप्त धावफलक ः दक्षिण आफ्रिका - २० षटकांत ४ बाद १६४ धावा (लॉरा वोलवॉर्डट्‌ ५३, ताझमिन ब्रिटस्‌ ६८, मेरीझॅन कॅप नाबाद २७, सोफी एक्लेस्टोन ३/२२) विजयी वि. इंग्लंड २० षटकांत ८ बाद १५८ धावा (डॅनी वॅट ३४, सोफीया डंकले २८, नॅट सीव्हर ४०, हेथर नाईट ३१, अयाबोंगा खाका ४/२९, शबनीम इस्माईल ३/२७).