मुंबई इंडियन्सचा विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई इंडियन्सचा विजय
मुंबई इंडियन्सचा विजय

मुंबई इंडियन्सचा विजय

sakal_logo
By

12935
मुंबई - गुजरात जायंटस् संघाविरुद्ध शनिवारी तडाखेबाज फलंदाजी करणारी मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर.

मुंबई इंडियन्सचा दणकेबाज विजय
महिला प्रीमियर लीग ः गुजरात जायंटस्‌वर १४३ धावांनी मात
मुंबई, ता. ४ ः हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आज महिला प्रीमियर लीग स्पर्धेचा श्रीगणेशा दणक्यात केला. गुजरात जायंटस् संघाचा १४३ धावांनी पराभव करत आपली ताकद दाखवली.
डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेला सलामीचा सामना कमालीचा एकतर्फी झाला. महिला टी-२० मध्ये द्विशतकी धावा अपवादाने होत असतात; परंतु मुंबई इंडियन्सने सलामीच्या सामन्यात सहजतेने ५ बाद २०७ अशी मजल मारली. त्यानंतर गुजरात संघाला १५.१ षटकांत ९ बाद ६४ धावांवर रोखले. गुजरात संघातही नावाजलेल्या परदेशी खेळाडू आहेत; परंतु तिसऱ्याच चेंडूवर कर्णधार बेथ मूनीचा गुडघा दुखावला. त्यामुळे तिला निवृत्त व्हावे लागले. गुजरात संघासाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर हर्लिन देओल आणि ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनर भोपळाही फोडू शकल्या नाहीत. तेथूनच गुजरातची घसरगुंडी सुरू झाली. नवव्या षटकांपर्यंत त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नव्हती.
त्याअगोदर मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी चांगली नव्हती. यास्तिका भाटिया एका धावेवर परतली. त्यानंतर धडाकेबाज फलंदाजीचा खेळ सुरू झाला. हेर्ली मॅथ्यूज आणि नॅट स्किवर यांनी अर्धशतकी भागीदारी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर मैदानात आली आणि तिने बघता बघता आक्रमक फलंदाजीचा नजराणा सादर केला. ३० चेंडूंचा सामना करताना तिने तब्बल १४ चौकार मारत ६५ धावांची खेळी करून ती बाद झाली. न्यूझीलंडची अष्टपैलू अमेलिया केरने २४ चेंडूंत नाबाद ४५ धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला.

संक्षिप्त धावफलक ः
मुंबई इंडियन्स ः २० षटकांत ५ बाद २०७ (हेर्ली मॅथ्यूज ४७ -३१ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार, नॅट स्किवर २३ - १८ चेंडू, ५ चौकार, हरमनप्रीर कौर ६५ - ३० चेंडू, १४ चौकार, अमेलिया केर नाबाद ४५ -२४ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, अॅशले गार्डनर ४-०-३८-१, स्नेह राणा ४-०-४३-२) वि. वि. गुजरात जायंटस्‌ ः १५.१ षटकांत ९ बाद ६४ (दयालन हेमलता नाबाद २९, नॅट स्किवर २-०-५-२, साकिया इशाकी ३.१-१-११-४, अमेलिया केर २-१-१२-२)