
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी
पुणे, नंदूरबार उपांत्य फेरीत
जळगाव, ता. १३ ः महिला विभागात पुण्याच्या संघाने, तर पुरुष विभागात नंदूरबारच्या संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. जळगाव येथील सागर पार्क मैदानावरील मॅटवर छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा सुरु आहे. महिला विभागाच्या उपांत्यपूर्व सामन्यात पुण्याने नाशिकचा ५३-१९ असा सहज पराभव केला. मध्यांतराला २३-१३ अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने उत्तरार्धात अधिक जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले.
कोल्हापूर पराभूत
पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात नंदूरबारने कोल्हापूरला ४६-२५ असे नमवित आगेकूच केली. विश्रांतीला २९-१२ अशी आघाडी घेणाऱ्या नंदूरबारने उत्तरार्धात सावध खेळ करीत हा विजय साकारला. ओंकार गाडे, दादासो आव्हाड, अभिजित गायकवाड, ऋषिकेश बनकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोल्हापूरकडून ओमकार पाटील, निखिल बर्गे उत्तम खेळले.