
बंगळूर - दिल्ली, महिला प्रीमियर लीग क्रीडा बातमी
बंगळूरच्या पराभवाची पंचमी
नवी मुंबई, ता. १३ ः रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाची पराभवाची मालिका सोमवारीही कायम राहिली. दिल्ली कॅपिटल्स संघाने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या महिला प्रीमियर लीगमधील लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघावर ६ विकेट व २ चेंडू राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा हा सलग पाचवा पराभव ठरला. दिल्ली कॅपिटल्स संघाने चौथ्या विजयाला गवसणी घातली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गुणतालिकेत मुंबई इंडियन्सनंतर दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून दिल्ली कॅपिटल्ससमोर १५१ धावांचे आव्हान उभे ठाकले. या स्पर्धेमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या मेग लॅनिंग (१५ धावा) व शेफाली वर्मा (०) या दोन्ही सलामी फलंदाजांना अपयश आले. त्यानंतर मात्र दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी छोट्या पण महत्त्वाच्या खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. एलिस कॅप्सीने ३८ धावांची, जेमिमा रॉड्रिग्जने ३२ धावांची, मेरीझेन कापने नाबाद ३२ धावांची आणि जेस जोनासन हिने नाबाद २९ धावांची खेळी साकारत दिल्ली कॅपिटल्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, याआधी दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची कर्णधार स्मृती मानधना हिची अपयशाची मालिका याही लढतीत कायम राहिली. शिखा पांडेच्या गोलंदाजीवर ती जेमिमा रॉड्रिग्जकरवी झेलबाद झाली. स्मृतीला ८ धावाच करता आल्या. सोफी डिव्हाईन हिने २१ धावांची खेळी केली. एलिस पेरी हिने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरसाठी मोलाची कामगिरी बजावली. तिने ५२ चेंडूंमध्ये ४ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ६७ धावांची शानदार खेळी केली. रिचा घोष हिनेही ३७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने २० षटकांत ४ बाद १५० धावा फटकावल्या. शिखा पांडे हिने २३ धावा देत तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
संक्षिप्त धावफलक ः रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २० षटकांत ४ बाद १५० धावा (एलिस पेरी नाबाद ६७, रिचा घोष ३७, शिखा पांडे ३/२३) पराभूत वि. दिल्ली कॅपिटल्स १९.४ षटकांत ४ बाद १५४ धावा (एलिस कॅप्सी ३८, जेमिमा रॉड्रिग्ज ३२, मेरीझेन काप नाबाद ३२, जेस जोनासन नाबाद २९, एस. आशा २/२७).