पर्यटनाचे आगर ः कुरुकलीच्या घोडेश्वरचा डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनाचे आगर ः कुरुकलीच्या घोडेश्वरचा डोंगर
पर्यटनाचे आगर ः कुरुकलीच्या घोडेश्वरचा डोंगर

पर्यटनाचे आगर ः कुरुकलीच्या घोडेश्वरचा डोंगर

sakal_logo
By

03017
03018

पर्यटनाचे आगर ः कुरुकलीच्या घोडेश्वरचा डोंगर

निपाणी - फोंडा राज्य मार्गावरील कागल तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकवस्तीचे गाव म्हणजे घोडेकरची कुरुकली होय. डोंगरमाथ्यावर ग्रामदैवत घोडेश्वरचे देखणे आणि निसर्गाच्या सान्निध्यात असणारे मंदिर नेहमीच कर्नाटक व महाराष्ट्रातील भक्तांना आणि पर्यटकांना भुरळ घालत असते. दिवसेंदिवस राज्य शासनाच्या विविध योजनांतून परिसराचा कायापालट कुरुकलीला राज्याच्या नकाशावर झळकवत आहे.
- प्रकाश तिराळे, मुरगूड
--------------
कुरुकली गावाला तसे जमिनीचे क्षेत्र फार कमी असूनही गावातील लोकांनी साधलेली शैक्षणिक प्रगती आणि विकास यामुळे हे गाव समृद्ध मानले जाते. गावात शिक्षक, वायरमन तसेच नोकरदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे येथे सुबत्ता नांदते, असेही म्हटले जाते. अनेक मोठमोठ्या पदावर काम करणारी माणसे याच गावातून जन्माला आली आहेत. त्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली आहे. गावावर तसे राजकीय नेत्यांचेही अधिकच लक्ष. कागल तालुक्यातील बऱ्याच वेळा राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेले आहे. गावामध्ये पाच ते सहा दूध संस्था, विकास सेवा संस्था चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत. या माध्यमातून महिलांच्या हाताला काम मिळत आहे. त्यामुळे सहाजिकच या गावच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळताना दिसत आहे.
अलीकडे या गावाकडे पर्यटनस्थळ म्हणूनच पाहिले जात आहे. त्याला कारण ही तसेच आहे. गावच्या पश्चिमेला गावापासून सुमारे दोन किलोमीटरवर असणाऱ्या घोडेश्वर देवालयाच्या विकासासाठी तत्कालीन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुमारे अडीच कोटींचा निधी खेचून आणून राज्य शासनाच्या ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाच्या पंगतीत नेऊन ठेवले आहे. येथील निसर्गसंपन्न परिसर, आल्हाददायक वातावरण पर्यटकांना भुरळ घालत असते. नेमके हेच हेरून विकास पाटील यांनी मुश्रीफ यांच्याकडे घोडेश्वर देवालय ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा केला.
टप्याटप्याने येथील परिसराचा विकास केला. यामध्ये मंदिराचे सुशोभीकरण, परिसरातील रस्ते, लाईट, स्री व पुरुष भक्तांसाठी वेगवेळे स्वतंत्र भक्तनिवास, भोजन करण्यासाठी भले मोठे स्वयंपाक घर, स्नानगृह, शौचालय, पालखी मार्गाचे नूतनीकरण, पेव्हींग ब्लॉक यासारखी विविध विकासकामे येथे केली आहेत. (कै.) खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या फंडातून उभारलेले सांस्कृतिक सभागृह मोठमोठ्या समारंभासाठी उपयुक्त ठरत आहे. या परिसराचा विकास होत असल्याने परिसराला नवा लुक आला आहे. गावापासून देवालय परिसरात जाण्यासाठी दुतर्फा झाडी असणाऱ्या नागमोडी वळणाचा रस्ता पर्यटकांना साद घालणारा डोंगरमाथ्याचा परिसर, नजरेस पडणारे राष्ट्रीय पक्षी मोरांचे थवे यामुळे येथील पर्यटनास आणखीनच बहर येतोय.
सध्या येथे सहकुटुंब येऊन मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेत येथील पर्यटनाचा आनंद लुटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. युवकांसाठी भोजन, पार्टी करण्याचे हे आवडते आणि हक्काचे ठिकाण बनले आहे. काही वर्षात या परिसरात येणाऱ्या लोकांची वाढलेली संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे येथे विकासाच्या पाऊलखुणा उठताना पहावयास मिळत आहेत.
--------------------
राज्यातील एकमेव देवस्थान
कुरुकली गावचे हे देवालय कुरुकली गावच्या हद्दीत आहे. कुरुकली, सुरुपली आणि बेनिक्रे या तीन गावांच्या वेशीवर आहे. या देवाची पूजाअर्चा करण्याचे काम गावातील दलित समाजाकडे आहे. शाहू महाराज यांनी या समाजाला पुजारी होण्याचा बहुमान दिला आहे. असे हे राज्यातील एकमेव देवस्थान आहे.
-----------------
कर्नाटक, महाराष्ट्रातून भाविक
येथील दसरा फार मोठा असतो. सात दिवस भक्तांची मांदियाळी या परिसरात असते. वर्षातून एकदा होणाऱ्या देवाच्या यात्रेसाठी लाखो भाविकांनी हजेरी लावलेली असते. कर्नाटक, महाराष्ट्रातील लाखो भाविक देवदर्शनासाठी घोडेश्वरच्या डोंगरावर येत असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mur22b02856 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top