
निढोरीत जनावरांना लम्पी : वेळेत औषधोपचार नाही.
निढोरीत लम्पीग्रस्त जनावरांच्या
औषधोपचाराकडे दुर्लक्ष
मुरगूड : कागल तालुक्यातील निढोरी येथे दुभत्या गायी, वासरे तसेच बैल आदी पशुधनास लम्पी आजाराची लागण झाली. पण, याकडे पशुसंवर्धन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तसेच त्यांच्यावर वेळेवर उपचार होत नसल्याची संबंधित शेतकऱ्यांची तक्रार आहे. निढोरी येथे जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला. पण, या जनावरांबाबत औषधोपचाराची हेळसांड होत आहे. वारंवार संबंधित विभागाकडे मागणी करूनही अधिकारी विविध कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याची संबंधितांची तक्रार आहे. आतापर्यंत पाच ते सहा जनावरे लम्पीमुळे दगावली; तर काही जनावरे आजारी आहेत. परिणामी, शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले. सध्या जनावरांच्या किमती या लाखांच्या घरात आहेत. पण, लम्पी रोगाने सामान्य दूध उत्पादक अडचणीत आला. त्यामुळे तत्काळ पंचनामे, नोंदीचा अहवाल आणि घरोघरी भेटी देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचारी यांनी योग्य ते सहकार्य करावे आणि शासकीय योजनांच्या पशुधनाची भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
......