
मुरगूडला वृतपत्र विक्रेत्यांना ई-श्रम कार्ड वाटप.
03534
मुरगूडला वृत्तपत्र विक्रेत्यांना ई-श्रम कार्ड
मुरगूड, ता. २३ : कागल तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे वृत्तपत्र विक्रेता व वृत्तपेपर व्यवसायातील कर्मचाऱ्यांना ई - श्रम कार्डाचे वाटप झाले.
मुरगूड नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी दिवंगत वृत्तपत्र विक्रेते उत्तम जाधव यांची कन्या सृष्टी जाधव हिची वैद्यकीय व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतल्याबद्दल कोल्हापूर कॅन्सर केअर सेंटरप्रमुख डॉ. रेश्मा पवार यांचा सत्कार झाला. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जीवन साळोखे होते. यावेळी वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्र व्यवसायातील कर्मचारी, पत्रकार व वृत्तपत्र छायाचित्रकारांचा सत्कार झाला.
कॉ. शिवाजी मगदूम म्हणाले, ‘कष्टकऱ्यांना घामाचे दाम मिळाले पाहिजे. वृत्तपत्र विक्रेता व वृत्तपेपर व्यवसायातील कर्मचाऱ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे.’ जीवन साळोखे म्हणाले, ‘वृत्तपत्रे सामान्यांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. समाज व मानव यांना जोडणारा सकारात्मक दुवा म्हणून वृत्तपत्र विक्रेते व कर्मचाऱ्यांकडे पाहावे. सजग समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत वृत्तपत्र महत्त्वाची भूमिका बजावतात.’ डॉ .रेश्मा पवार, अमर पाटील, तानाजी पाटील (आदमापूरकर) यांची भाषणे झाली. सुनील लोंढे, अमर पाटील, सचिन बरगे, संजय पाटील, संजय आवटी, रामदास भोर, पप्पू बारदेस्कर, शिवगोंडा पाटील, रघुनाथ कांबळे, किरण व्हनगुत्ते, पत्रकारांसह वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्र कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी, बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.