आमदार हसन मुश्रीफ वाढदिवस विशेष...लेख.

आमदार हसन मुश्रीफ वाढदिवस विशेष...लेख.

विकासपुरुष

सामान्यांचा ‘आवाज’

जनसामान्यांच्या कामाचा धडाका, विकासकामांत सदैव अग्रेसर, जनतेशी थेट संपर्क साधणारे नेतृत्व म्हणून ख्याती मिळवणारे राष्ट्रवादीचे नेते, माजी ग्रामविकासमंत्री व विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने...
--------

जिल्ह्याचे राजकारण राज्यातील इतर जिल्ह्यांपेक्षा स्पर्धात्मक आहे. राजर्षी शाहू महाराजांचा वसा आणि वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात उत्तम शेती, लघुउद्योग त्यामध्ये असणारे फौंड्री उद्योगाचे व्यापक महत्त्व, पतसंस्था, दूध संस्था, सेवा सोसायट्या, सूत गिरण्या आणि शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचे असणारे साखर कारखाने हे सगळे सहकाराशी निगडित आहे. असा हा जिल्हा. कोल्हापूर, हुपरीतील चांदी - दागिने उद्योग, मलकापूर, वडगाव, कागल, मुरगूड, गडहिंग्लज, आजरा व हातकणंगले येथे असणाऱ्या मोठ्या बाजारपेठा अशा रचनेतून कोल्हापूर परिसराचे अर्थकारण उभे राहते. उत्तम साहित्यनिर्मिती, यशस्वी क्रीडापटू, समृद्ध अशी खाद्यसंस्कृती आहे.अशा या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महत्त्वाकांक्षी कल्पक नजरेतून धाडसी आणि कार्यमग्न कार्यकर्त्यांची फळी उभा करण्याचे कामही जिल्ह्यात मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.
राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक हित जोपासण्याचे काम आमदार मुश्रीफ नेहमीच करतात.
जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम असेल किंवा शिक्षण, आरोग्याशी निगडित समस्या असेल त्यावर गुणकारी औषध म्हणजे हसन मुश्रीफ मानले जाते. त्यामुळेच सामान्य माणूस त्यांना दैवत मानतो.
जनतेची कामे करत हजारो कोटींचा निधी जिल्ह्यात विकासकामांसाठी आणि जिल्ह्याच्या आरोग्यासाठी सरकारच्या तिजोरीतून खेचून आणत लोकप्रतिनिधींचे कार्य संकटकाळी कसे असावे, याचे उत्तम व आदर्शवत उदाहरण राज्यासमोर ठेवण्याचे काम कोरोना काळात ग्रामविकासमंत्री असताना हसन मुश्रीफ यांनी केले.
समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींची धडपड अत्यंत महत्त्वाची असते. त्यांच्या धडपडीतूनच त्या त्या मतदारसंघाला आणि राज्याला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या हातून होत असते. त्याच पद्धतीने आमदार मुश्रीफ यांनी प्रचंड विकासकामांच्या जोरावर सामान्य जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे.
राजकीय कारकिर्दीत कागलच्या शाहू साखर कारखान्याच्या संचालकपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांनी विक्रमसिंह घाटगे यांचे नेतृत्व सोडून सदाशिव मंडलिक यांचे नेतृत्व स्वीकारले. १९८५ च्या निवडणुकीत सदाशिराव मंडलिक २३१ मतांनी विजयी झाले. तेथून पुढे त्यांनी मंडलिकांचे सरसेनापती म्हणून काम केले व त्यातून त्यांनी राजकीय कारकिर्द घडविली.
कागल पंचायत समितीच्या निवडणुकीत ते १८ मतांनी विजयी झाले व सभापती म्हणून काम केले. सभापती पदाची धुरा समर्थपणे सांभाळली. एक वर्षाचा कार्यकाळ असतानाच १९९९ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदाच सात हजार मतांनी संजय घाटगे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर दीड वर्षात झालेल्या निवडणुकीत ३५०० मतांनी कागलच्या जनतेने हसन मुश्रीफ यांना पहिल्यांदा आमदार केलेच. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुश्रीफ यांना जिल्ह्यातील तिसरा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान दिले.
शेकडो कोटींची विकासकामे जिल्ह्यात खेचून आणण्यात त्यांचा हातखंडा आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनात सहकार, शिक्षण यासह अन्य सर्वच क्षेत्रांतील त्यांनी केलेले काम हे त्यांच्या राजकीय यशस्वी कार्यपध्दतीचे गमक आहे. एवढ्यावर समाधान मानता त्यांनी त्याच्या जोडीला मानवतेच्या भावनेतून केलेले काम तर त्याहून कितीतरी पटीने मोठे आहे. त्यांच्या कामाची नोंद घेतल्याशिवाय साक्षात इतिहासालाही पुढे जाता येणार नाही.
पब्लिक ट्रस्ट कायद्याच्या कलम ४१ अ अन्वये नोंदणी झालेल्या रुग्णालयात मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात खऱ्या अर्थाने आमदार हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. विधी न्याय व विशेष सहाय्य मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी हे पुण्याईचे काम केले. या कायद्याखाली एकट्या मुंबईत नोंदलेल्या रुग्णालयांची संख्या पन्नासहून जास्त आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या दहा टक्के रुग्णांना संबंधित रुग्णालयात मोफत उपचार मिळण्याची तरतूद कायद्यात आहे.
राज्यातील इतर शहरांत अशी रुग्णालये आहेत. या सर्वच रुग्णालयांमधून राज्यातील गोरगरीब रुग्णांना १० टक्के मोफत उपचार झालेच पाहिजेत, यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेहमीच यंत्रणा तयार ठेवलेली असते. त्यामुळे मुंबई-पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांतील रुग्णालयांमधून ही सुविधा सुलभपणे वीस वर्षांपासून गोरगरीब जनतेला मिळत आहे.
लोकांची गर्दी नसली तर ज्यांचा श्वास गुदमरतो अशा मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे आमदार हसन मुश्रीफ. सकाळी सहापासून रात्री उशिरापर्यंत जनतेशी निगडित कामे करण्यात वेळ घालवणारे हे नेतृत्व कागल तालुक्याला लाभलेली देणगी आहे. ग्रामपंचायतीपासून मंत्रालयापर्यंत, गाव - घरापासून दिल्लीपर्यंत, घरच्या भांडणापासून राजकीय भांडणापर्यंत सर्व अडीअडचणी सोडवत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे, सर्वसामान्याचे समाधान कसे होईल, याकडेच आमदार मुश्रीफ यांचे लक्ष असते. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची भावना त्यांनी ठेवली आहे. त्याच जोरावर आतापर्यंत झालेल्या निवडणुकांत विजयश्री खेचून आणण्याचे काम ते करू शकले. खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर समाजातील परितक्त्या विधवा महिलांना पेन्शन असेल किंवा आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुलांचा प्रश्न असेल तो सोडवण्याचा प्रयत्न कुशलतेने त्यांनी केला. त्यासाठी नवे कायदे आणले. त्याचा राज्यभरातील गोरगरिबांना फायदा झाला. आई-वडिलांना प्रतिमहिना दोघांना मिळून बाराशे रुपये देण्याची श्रावणबाळ योजना त्यांनीच सुरू केली. त्यानंतर त्यांना ‘श्रावणबाळ’ हे नावदेखील मिळाले. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातही आमूलाग्र बदल घडवला. लाखो रुपयांची ऑपरेशन मोठमोठ्या फाईव्ह आणि थ्री स्टार दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये मोफत करून अनेकांना जीवदान दिले. त्यामुळे महाराष्ट्राचा ''महाडॉक्टर'' ही पदवी मिळून गेली. कामाचा माणूस अशी ही त्यांची ओळख राज्यभर आहे. अशा या बहुआयामी नेत्याला वाढदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

- प्रकाश तिराळे, मुरगूड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com