
नेसरीत काजू बागा बहरल्या
02121
नेसरी: हवामानातील सकारात्मक बदलाने काजू मोहर बहरला आहे. (छायाचित्र ः दिनकर पाटील, नेसरी)
-------------
नेसरीत काजू बागा बहरल्या
उत्पन्न वाढण्याची शेतकऱ्यांची आशा; पालापाचोळा स्वच्छतेवर भर, योग्य भावाची अपेक्षा
दिनकर पाटील ः सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. ९ : हवामानातील सकारात्मक बदलामुळे काजू बागा मोहराने बहरू लागल्याने काजू उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
नेसरीसह परिसरातील अर्जुनवाडी, कानडेवाडी, सरोळी, तळेवाडी, तारेवाडी, सावतवाडी तर्फ नेसरी, बिद्रेवाडी, हेब्बाळ-जलद्याळ, लिंगनूर, वाघराळी, कुमरी आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात काजूच्या बागा आहेत. पालापाचोळा, मशागत, औषध फवारणी यावर शेतकरी हजारो रुपये खर्च करत आहेत. काजू उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी सुखावला आहे. दोन-तीन वर्षांत काजू दर घसरण सुरू आहे. प्रतिकिलो ९०-१०० दर होता. काजू दरात सतत होत असलेल्या घसरणीमुळे शेतकरी चिंतेत आहे. प्रतिकिलो १५०-२०० रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. नेसरी परिसरात शेतकऱ्यांनी ऊस शेतीला पर्याय म्हणून माळरानासह पडीक जागेत मोठ्या प्रमाणात काजू झाडांची लागवड केली आहे. पाच वर्षांपूर्वी काजू प्रतिकिलो १६० रुपये दर मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. काजू उत्पन्न वाढण्याची अधिक शक्यता असल्याने काजू दरात ही वाढ व्हावी, अशी अपेक्षा काजू बागायदार व्यक्त करत आहेत.