
गोकूळचे संचालक मिणचेकर यांच्या टोप दूध संस्थेत दफ्तर चोरी
टोपमधील संस्थांतून
प्रोसिडिंग, रोकड चोरीस
निवडणुकीची किनार; चौकशीचाही ससेमिरा
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २४ : ‘गोकुळ’चे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या टोप (ता. हातकणंगले) येथील कल्लेश्र्वर दूध संस्थेतून तीन वर्षांचे प्रोसिडिंग चोरीस गेले. दरम्यान, याच समूहाशी निगडित महालक्ष्मी दूध संस्था आणि कल्लेश्र्वर महालक्ष्मी महिला ग्रामीण पतसंस्थेतही चोरी झाली. रविवारी (ता. २२) कुलूप तोडून २९ हजार ८८१ रुपये व काही वर्षांचे प्रोसिडिंग चोरीस गेल्याची तक्रार संतोष पाटील यांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर आणि सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाकडून चौकशी सुरू असताना चोरी झाल्याने ग्रामस्थांमधून चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे संस्थेची काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत आणि आता दफ्तरच चोरीस गेल्याचा दाखला पोलिस देणार आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी : संस्थेचे कर्मचारी संतोष पाटील सोमवारी दरवाजाचे कुलूप तोडल्याचे व तिजोरीचा दरवाजा उचकटल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाला माहिती दिली. शिरोली एमआयडीसी पोलिसांत संतोष पाटील यांनी फिर्याद दिली. तिजोरीतून २०१७ -१८ चे महालक्ष्मी दूध संस्थेचे प्रोसिडिंग बुक व दूध संस्था नोटीस बुक तसेच २०१८-१९ चे कल्लेश्र्वर दूध संस्थेचे वार्षिक सभेचे प्रोसेडिंग बुक व २०१९- २० वर्षांचे मासिक प्रोसिडिंग बुक व रोकड २९,८८१ कपाटातून चोरीला गेले आहे. हे काम माहीतगाराचे असणार, असा अंदाज शिरोली पोलिसांनी वर्तवला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Nga22b01911 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..