
मागणी घटल्याने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींची गती मंदावली
मागणी घटली; गती मंदावली
जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील चित्र; कच्च्या माल दरातील घसरण ठरतेय डोकेदुखी
अभिजित कुलकर्णी / सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. १ : मागणी घटल्याने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींची गती मंदावली आहे. मोठ्या उद्योगांवर याचा परिणाम पंधरा टक्के जाणवत असला तरी सूक्ष्म व लघुउद्योगांवर याची तीव्रता चाळीस टक्के आहे. शिवाय कच्च्या मालाच्या दरातील घसरण व्यावसायिकांची डोकेदुखी ठरत आहे.
कास्टिंग उत्पादनात कोल्हापूरने दहा वर्षांत मोठी झेप घेतली आहे. मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या. कोरोना महामारीनंतर उद्योजक नव्या उमेदीने कामाला लागले. पण दिवाळीनंतर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा मरगळ आली. ही मरगळ देशांतर्गत बाजारपेठेत मागणी घटल्याने निर्माण झाली आहे.
छोटे मशीन शाॅप, माल वाहतूकदार, टुलिंग व्यावसायिक, रोजंदारीवर काम करणारे मजूर, कच्च्या मालाचे पुरवठादार, मजूर पुरवठा करणारे ठेकेदार अशा सर्वच घटकांवर याचा परिणाम झाला.
छोट्या उद्योजकांची सत्तर टक्के उलाढाल ही बोरिंगवर (कास्टिंगवर प्रक्रिया करताना पडणारा लोखंडाचा चुरा) असते. तयार पार्टची मागणी घटल्याने महिन्यात दहा ते पंधरा दिवस मशिन शाॅप सुरू होते. काम कमी झाल्याने बोरिंगचे प्रमाण पन्नास टक्के घटले. त्यातच बोरिंगचे दरही प्रतिटन सहा हजारांनी कमी झाले. त्यामुळे लघुउद्योजकांवर मंदीचा परिणाम पन्नास टक्केहून अधिक जाणवत आहे. लेथ मशिन आॅपरेटर मिळत नसल्याने आहे त्या कामगारांना टिकवण्यासाठी लघुउद्योजकांना कसरत करावी लागते.
निर्यातक्षम उद्योगांवर याचा फारसा परिणाम जाणवत नाही. तरीही जाणकारांच्या मते जानेवारी २०२३ पासुन मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
...........
कोट
साधारणपणे दरवर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनात घट झालेली असते. ही घट सामान्य आहे. जानेवारी २०२३ पासून औद्योगिक क्षेत्र पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल. काळजीचे कारण नाही.
- निरज झंवर, व्यवस्थापकीय संचालक, झंवर उद्योगसमूह
...........
सर्वच उद्योग क्षेत्रात साधारणतः वीस टक्केपर्यंत घट झाली आहे. कच्च्या मालाचे दरही कमी होत आहेत. हे कशामुळे होत आहे याबाबत स्पष्टीकरण देता येणार नाही. पण लवकरच परिस्थितीतून बाहेर पडता येईल.
- एम. वाय. पाटील
उपाध्यक्ष - शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ( स्मॅक )
बाजारपेठेतील सर्वच कच्च्या मालाचे दर घसरत आहेत. दर कमी होऊनही मागणी नसल्याने दिवाळीपूर्वी दररोज आठ ते दहा टनपर्यंत होणारी बोरिंगची खरेदी व विक्री पाच ते सहा टन एवढीच आहे.
- बाबासाहेब पाटील
शुभमराज टेक्नोव्हीजन - बोरिंग पुरवठादार