
शिये गावसभेत दगडखाण आणि बिअर शाॅप परवान्यावरुन गदारोळ
दगडखाण प्रकरणी शिये ग्रामसभेत गदारोळ
शिये, ता. ७ : दगडखाण प्रकरणी सरपंचांनी विरोधाभास निर्माण करतील, असे दोन ठराव लागोपाठ घेत लेटरहेडचा गैरवापर केला, असा आरोप शेतकरी संघटना व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यामुळे शिये (ता. करवीर) ग्रामसभेत तणाव निर्माण झाला.
२६ जानेवारी रोजी कोरमअभावी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा सोमवारी (ता. ६) झाली. सरपंच शीतल मगदूम या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
आरोप-प्रत्यारोप झाल्याने ग्रामसभेत गदारोळ झाला. त्यातच गावात दारूबंदी असताना एका बीअर शॉपीला परवानगी देण्यात आली. यासाठी बोगस दाखला देण्यात आला. बोगस कागदपत्रांच्या आधारे घेण्यात आलेल्या परवानगीबाबत राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निर्णय होईल; पण दाखला देणारा आणि घेणारा यापैकी दोषींवर कायद्यान्वये कारवाई व्हायलाच हवी, अन्यथा समाजात कायद्याचा धाकच उरणार नाही, अशी भूमिका घेतली. परिणामी ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांनी सभा संपल्याचे जाहीर करत काढता पाय घेतला; पण नियमानुसार सभा संपली नसल्याचा निषेध करत शेतकरी संघटना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडला. तंटामुक्त समिती अध्यक्ष पांडुरंग पाटील व माजी उपसरपंच विलास जाधव यांनी ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सरपंच शीतल मगदूम यांनी पुन्हा असा प्रकार घडणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अॅड. माणिक शिंदे, उत्तम पाटील, भाजपचे अक्षय पाटील, मारुती जाधव, व्यंकट पाटील, योगेश पाटील, उत्तम भि. पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.