
नागावात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन
नागाव येथे उद्यापासून
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
नागाव, ता. २५ : येथील सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळातर्फे ५५ किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा मुलांच्या व महिला निमंत्रित खुल्या गटात होत आहेत. शनिवार (ता. २७) व रविवार (ता. २८) रोजी नागाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सिद्धार्थ मैदानावर या स्पर्धा होत आहेत. व्हर्साटाईल ग्रुपच्या संचालिका बिनाताई जानवाडकर व ज्येष्ठ उद्योजक सुरेंद्र जैन यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धांचे उद्घाटन होत आहे, अशी माहिती सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास पंधरा हजार रुपये रोख व चषक द्वितीय क्रमांक येणाऱ्या संघास दहा हजार रुपये रोख व चषक आणि तृतीय येणाऱ्या संघास सात हजार रुपये रोख व चषक, असे बक्षीस देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त आदर्श संघ, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी सिद्धार्थ क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचे लखन कांबळे, अजय सर्वोदय, स्वप्निल राजाध्यक्ष व जीवन कांबळे यांच्याशी संपर्क साधून आपल्या संघाची नोंदणी करावयाची आहे, असे करण्यात आले.