दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान
दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान

दोन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान

sakal_logo
By

पोलिसांच्या चकमकीत
दोन नक्षलवादी ठार

गडचिरोली पोलिसांची छत्तीसगड सीमेत कारवाई

गडचिरोली, ता. २३ : गोपनीय माहितीच्या आधारे छत्तीसगड राज्यातीन बिजापूर पोलिसांसोबत गडचिरोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत करून दोन नक्षलवादी ठार झाले, तर एक गंभीर जखमी आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शुक्रवार (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले की, उपविभाग जिमलगट्टा अंतर्गत येणाऱ्या उपपोलिस स्टेशन दामरंचापासून महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकामेटा जंगल परिसरात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने एकत्र जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या गोपनीय माहितीवरून गडचिरोली पोलिस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-६०) ३०० जवान व छत्तीसगडच्या डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड) पोलिस पथकाचे २० जवान यांनी संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबविले.
शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी नक्षलवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, नक्षलवाद्यांनी पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. ही चकमक सुमारे ३० ते ४५ मिनिटे चालू होती. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
चकमकीनंतर या जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता घटनास्थळावर १ महिला नक्षल व १ पुरुष नक्षल मृतावस्थेत आढळले. मृत महिला नक्षलीचे नाव कांती लिंगच्चा ऊर्फ अनिता ( वय ४१, रा. लक्ष्मीसागर, तेलंगणा) असे आहे. ती सध्या डीव्हीसीएम (इंद्रावेली एरीया कमेटी) या पदावर कार्यरत होती. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने १६ लाख व तेलंगणा शासनाने ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच ती कुमारम नक्षली दलमच्या भीम डिव्हीजन कमिटीच्या तेलंगणा राज्य समिती सचीव मैलारापू अडेल्लु ऊर्फ भास्कर याची पत्नी होती. या चकमकीत लचमया कुच्चा बेलादी (वय २८, रा. टेकामेटा, छत्तीसगड) हा जखमी अवस्थेत आढळला. तो जनमिलीशिया सदस्य म्हणून नक्षलवाद्याकरिता काम करत होता. तसेच घटनास्थळावर २ नग एसएलआर रायफल, १ नग भरमार रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलिस दलास यश आले आहे.
या जंगल परिसरात सी-६० पथकाचे जवान व डीआरजी पोलिस पथक यांचे संयुक्त नक्षलविरोधी अभियान आणखी सुरू असून जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलिस दल व बिजापूर पोलिसांनी पहिल्यांदाच अतिदुर्गम भागात नक्षलविरोधी अभियान राबविले आहे. पुढील तपास बिजापूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असेही पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.