नानीबाई चिखली - हसन मुश्रीफ वाढदिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नानीबाई चिखली - हसन मुश्रीफ वाढदिवस
नानीबाई चिखली - हसन मुश्रीफ वाढदिवस

नानीबाई चिखली - हसन मुश्रीफ वाढदिवस

sakal_logo
By

समर्पित नेतृत्व

कितीही संकटं आली तरी अखंडपणे संघर्षाशी सामना करून पुन्हा त्याच ताकदीनं उभं राहायचं...सत्यावर अखंडपणे विश्वास ठेवायचा ...तळमळीने जनतेच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचं... याचमुळे जनतेशी विश्वासाचं नातं निर्माण होतं... अर्थात यासाठी प्रचंड मानसिक ताकद असावी लागते.. ही विलक्षण क्षमता ज्यांच्यामध्ये कायमपणे पाहायला मिळते असं एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनेते आमदार हसन मुश्रीफ. आज त्यांचा वाढदिन. त्यानिमित्त...
--------------
हसन मुश्रीफ म्हणजे कागलच्या मातीला लाभलेलं वरदानच म्हणावं लागेल. त्यांच्या आमदारकीची, मंत्रिपदाची २५ वर्षं म्हणजे विकासपर्वच आहे. वृद्ध, अपंग, निराधार व रुग्ण या सर्वांसाठी त्यांनी संवेदनशीलपणे काम केले. याचमुळे त्यांच्या नेतृत्वातून माणुसकीचं अफाट दर्शन होत असतं. ज्या नेतृत्वाला माणुसकीचा स्पर्श आहे ते नेतृत्व लक्षवेधी ठरत असते. यामुळेच समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे.
तसं बघितलं तर मुश्रीफ यांचे नेतृत्व पंचवीस ते तीस वर्षं अखंडपणे विशिष्ट उंचीवर कायम आहे. फक्त कागल किंवा कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर राज्याला त्यांनी प्रभावित केलेले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत आणि तळमळ कायमपणे चर्चेचा विषय असते. विधानसभेतही अगदी विरोधी पक्षनेत्यानीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. एखादं नेतृत्व ज्यावेळी सर्वमान्य होतं त्याचवेळी असं भाग्य लाभते. कागलसारख्या संवेदनशील तालुक्यातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून येणारे मुश्रीफ आज जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. आमदार आणि मंत्री म्हणून काम करत असतानाच जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील महत्वाच्या संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहेत. आपल्या कार्यकर्तृत्वातून त्यांनी जपलेली ही विश्वासार्हता नक्कीच मनाला भावणारी आहे. फक्त राजकारण करणारी व्यक्ती एवढी उंची नक्कीच गाठू शकत नाही. विकासकामे करताना त्यांनी जपलेली सात्विकता व विधायक दृष्टिकोन यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा प्रभाव निर्माण झालेला आहे.
त्यांची भावणारी महत्त्वाची बाब म्हणजे यशस्वी नेतृत्व म्हणून आज साहेबांनी जी उंची गाठली आहे, ती गाठत असताना त्यांनी कार्यकर्त्यांनाही कायमपणे बरोबर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जनता आणि कार्यकर्ता यांना त्यांनी नेहमीच सन्मानाची वागणूक दिली आहे. कार्यकर्ता हा त्यांच्या अखंड राजकीय प्रवासाचा श्वास आणि विश्वास राहिलेला आहे. जिथं संधी मिळेल तिथं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य न्याय दिलेला आहे. आज त्यांच्याकडे असणारी कार्यकर्त्यांची मजबूत फळी ही याच विश्वासातून निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांवर निर्व्याज प्रेम करणारा नेता म्हणून मुश्रीफ नक्कीच वेगळे राजकीय नेते वाटतात.

तसं पाहिलं तर मुश्रीफ साहेबांवर अनेक संघर्षाचे प्रसंग आले. पण ते कधीही डगमगले नाहीत. ‘कर नाही त्याला डर कशाला’ उक्तीप्रमाणे त्यांनी काम करत राहणं पसंत केलं. लोककल्याणात रमल्यामुळेच त्यांनी संकटाला कधीही दाद दिलेली नाही. त्यांच्या घरावर ईडीच्या छाप्यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते घरासमोर जमले होते. त्या प्रचंड गर्दीत लोकांचं प्रेम प्रतिबिंबित होत होतं.. नेता आणि जनता यांचं नातं किती घट्ट असतं याचं मनाला भावणारं दर्शन यानिमित्तानं राज्याला झालं. त्या गर्दीतून नेत्यावर असणारं फक्त प्रेमच नव्हे तर विश्वासही दिसत होता. निष्ठावंत नेत्याचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून हे वेगळं उदाहरण कायमपणे सांगितलं जाईल. याचा अर्थ होतो की, त्यांनी जनतेला एवढं प्रेम दिलेलं आहे की, नेत्यावरील संकट जनतेला आपलं संकट वाटू लागतं.

विकासकामांबाबत बोलायचं झालं तर सर्वांगीण विकासाचं आदर्श उदाहरण म्हणून कागल मतदारसंघाचं उदाहरण देता येईल. गावागावात झालेल्या पाण्याच्या योजना, समाज मंदिरं, रस्त्याची कामं या शाश्वत कामांबरोबरच इतर अनेक विकास कामांमुळे हा मतदारसंघ समृद्ध झालेला आहे. समाज सुधारकांचे पुतळे उभारून त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचं काम खऱ्या अर्थाने या मतदारसंघात झाल्याचं दिसून येतंय. याशिवाय मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात साहेब सहभागी होत असतात. प्रत्येकाला आधार देत असतात. पहाटेचा जनता दरबार तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे.
सत्ता किंवा पद असो वा नसो साहेब अखंडपणे जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. यामुळेच कागलचा लौकिक राज्याच्या नकाशात नेहमीच शोभून दिसत असतो. व्यक्ती कार्यकर्तृत्वातून किती मोठं विश्व निर्माण करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणून हसन मुश्रीफ यांचा उल्लेख करावा लागेल. अशा सर्वव्यापी नेतृत्वास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!
----------------
चौकट
निवासस्थान जनतेसाठी जणू तीर्थक्षेत्रच...
अडचणीत असणारा प्रत्येकजण इथं विश्वासाने येतो व आपलं काम करून घेऊन जातो. जनता दरबारामुळेच मुश्रीफ जनतेशी खऱ्या अर्थाने एकरूप होत असतात. त्यांनी मनात आणलं असतं तर कोल्हापूरसारख्या ठिकाणी आलिशान बंगला बांधून ते राहू शकले असते. पण मतदारसंघातील लोकांना सहजपणे उपलब्ध व्हावे या भावनेतून ते आजही कागलमध्ये कायमपणे राहत आहेत. बोळातील त्यांचं निवासस्थान गोरगरीब जनतेसाठी जणू तीर्थक्षेत्र झालं आहे.

- प्रवीण भोसले, नानीबाई चिखली
संचालक, बिद्री सहकारी साखर कारखाना