नानीबाई चिखली - वाढदिवस

नानीबाई चिखली - वाढदिवस

पट्टी ः आशीषभाई शाह वाढदिवस विशेष

शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ

अंधारात संयमाने दिवा लावावा लागतो. सामाजिक विशेषत: शैक्षणिक अंधकाराच्या भानातून ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ विचारसूत्राचा आणि जीवनसूत्राचा जन्म झाला असावा. एक-दोन नव्हे तब्बल ६३ वर्षांपूर्वी हातात चिमुकली दिवटी घेऊन सभोवतालच्या अंधारात संयमाने दिवा लावणाऱ्या द्रष्ट्या पुरुषांच्या दूरदृष्टीचे कर्तृत्व लक्षात घेण्याजोगे आहे. याची सुरवात सीमाभागात पद्मभूषण देवचंदजी शाह यांनी केली आणि खऱ्या अर्थाने ते पूर्णत्वास नेण्याचे काम त्यांचेच नातू असलेले आशीषभाई शाह करीत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांची असलेली वाटचाल निश्चितच अभिमानास्पद आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त...
--------------
सीमाभागातील मराठी भाषक विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारी शिक्षण संस्था अशी ओळख असणारे जनता शिक्षण मंडळ अर्जुननगर (ता. कागल) संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व उद्योजक आशीषभाई शाह यांचा जन्म १६ एप्रिल १९७५ रोजी श्रीमंत व्यापारी व सामाजिक वारसा असलेल्या कुटुंबात झाला. आजोबा पद्मभूषण देवचंदजी शाह यांनी सीमाभागातील शेतकरी, शेतमजूर, हमाल, बिडी कामगार, तंबाखू कामगार यांच्या मुलांना अत्यल्प शुल्कात दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे ही तळमळ बाळगून जनता शिक्षण मंडळाची स्थापना १९६० मध्ये केली. सुरुवातीपासून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून उत्तमोत्तम अध्यापकवृंद, भौतिक सुविधा पुरवून जबाबदार व कर्तबगार नागरिक घडविण्याचे काम केले. त्यांच्या विचारांप्रमाणेच पुढील वाटचाल कै. किरणभाई शाह यांनी केली.
स्व. किरणभाई शाह यांच्या निधनानंतर आशीषभाई शाह यांनी ही जबाबदारी निष्ठेने सांभाळली आहे. आज या शिक्षण संकुलात केजी टू पीजी (प्राथमिकपासून पदव्युत्तर पदवी) शिक्षणाची सोय आहे. ५००० पेक्षा अधिक विद्यार्थी संस्थेत शिकत आहेत. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू म्हणून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कार मिळाले पाहिजे यासाठी ते कायम आग्रही असतात. यशस्वी उद्योजक म्हणून व्यग्र वेळापत्रकातून ते शिक्षण संस्थेसाठी जास्तीत जास्त वेळ देतात. विद्यार्थी- पालकांशी त्यांचा थेट संपर्क. मराठी कॉन्व्हेंट स्कूल, किरणभाई शाह विद्यानिकेतन, मोहनलाल दोशी विद्यालय, देवचंद कॉलेज या सर्व ठिकाणी त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभत असते.
आज संस्थेचा विस्तार सातत्याने सुरू आहे. संस्था वृद्धिंगत झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान व संस्कार मिळालेच पाहिजेत; यासाठी त्यांचा आग्रह असतो. नवनवीन अभ्यासक्रम, कोर्सेस व त्यासाठी सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा गुणवत्तापूर्ण अध्यापक, यासाठी ते प्रयत्नशील असतात. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी ‘देव आशीष विधी महाविद्यालय’ लवकरच सुरू होत आहे.
देवचंद कॉलेजला नॅककडून सुरुवातीला ‘ए’ ग्रेड मिळाली. २००९ मध्ये थोड्या गुणांनी ‘ए’ ग्रेड हुकली. पुन्हा ‘ए’ ग्रेड मिळाली पाहिजे यासाठी आशीषभाईनी सर्वांना विश्वासात घेऊन प्रयत्न केले व २०१६ मध्ये देवचंद कॉलेजला ‘ए’ ग्रेड मिळाली. या गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे, असा ध्यास त्यांनी सर्व घटकांमध्ये रुजविला व पुन्हा २०२२ मध्ये ‘ए प्लस’ ग्रेड मिळाली. हे शिक्षणसंकुल म्हणजे एक कुटुंब आहे अशी त्यांची धारणा आहे आणि कुटुंबप्रमुख या नात्याने ते आपली जबाबदारी खूप सुंदर सांभाळत असतात.
विविध धर्मीयांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे व सौहार्दाचे संबंध आहेत. धार्मिक कार्यामध्येही ते तितक्याच समरसतेने सहभागी होतात. निपाणी नगरीचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर त्यांच्या घराजवळ आहे. या ग्रामदेवतेची त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात होते. त्यामध्ये आशीषभाईंचा सक्रिय सहभाग असतो. या छोट्या मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे. भव्य मंदिर बांधकाम सुरू आहे. त्यांमध्येही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील दिग्गज घराण्याशी स्वर्गीय पद्मभूषण देवचंदजी शाह, श्रीमान किरणभाई शाह यांच्यापासून असणारे सौहार्दाचे संबंध आशीषभाई शाह यांनी जपले आहेत. सर्व पक्षांतील राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळकीचे, आपुलकीचे नाते आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाकडे त्यांचा अधिक ओढा आहे. या सर्वांचा उपयोग शिक्षण संस्थेसाठी, विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यासाठी ते नेहमी सजग असतात. सरस्वतीचे नम्र उपासक असणाऱ्या आशीषभाई शाह यांना सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करण्यासाठी दीर्घायुरारोग्य लाभो, अशी त्यांच्या वाढदिनी सदिच्छा !
---------------
चौकट
शिक्षणासह इतर क्षेत्रांतही योगदान
सीमाभागातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून सवलती व नोकरीत संधी मिळाली पाहिजे; यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. गेल्या महिन्यात भरविण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. आपापला उद्योग-व्यवसाय सांभाळून शिक्षण क्षेत्रासाठी आशीषभाईंनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. उद्योग, व्यवसाय, शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. चंद्रप्रभू अर्बन बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने जो महापूर आला, त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील नदीकाठची गावे उद्ध्वस्त झाली. त्यांना मदत करताना योग्य व्यक्तींना मदत मिळाली पाहिजे हे ध्यानात ठेवून त्यांनी यादी बनवली व संसारोपयोगी वस्तूंचे किट बनवून त्यांच्यापर्यंत पोचवले.
- प्रा. नानासाहेब जामदार - मराठी विभाग, देवचंद कॉलेज, अर्जुननगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com