
जैन समाजाचे कार्य विसरणे अशक्य - शरद पवार
फोटो ७८४५
पुणे : जितो कनेक्ट परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ‘प्राईड ऑफ पुणे’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या वेळी (डावीकडून) विमल बाफना, सुधीर मेहता, प्रियम तातेड, विजय भंडारी, पवार, गणपतराज चौधरी, संजय चोरडिया, विठ्ठल मणियार, संजय नहार, अतुल चोरडिया.
07842
पुणे ः उद्योजक संजय घोडावत, अशोक दलवाई यांचा सत्कार करताना ज्येष्ठ उद्योजक फत्तेचंद रांका.
जैन समाजाचे कार्य विसरणे अशक्य
---
शरद पवार; जितो कनेक्ट परिषदेत विविध पुरस्कारांचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ : ‘‘भगवान महावीर यांनी दिलेले शांती व क्षमा हे तत्त्वज्ञान फक्त देशातच नाही, तर विदेशातही स्वीकारले गेले, याचा गर्व आहे. देशात जेव्हा संकट निर्माण होते, तेव्हा जैन समुदाय समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. देशासाठी जैन समाजाने केलेले काम आम्ही कधीही विसरू शकत नाही,’’ असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले.
जितो कनेक्ट परिषदेत श्री. पवार यांच्या हस्ते ‘प्राईड ऑफ पुणे’ पुरस्कार उद्योजक विजय भंडारी, सुधीर मेहता, युवा उद्योजक अतुल चोरडिया, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे संस्थापक संजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्त्या विमल बाफना, संजय नहार, अॅथलेटिक्स खेळाडू प्रियम तातेड यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘जितो कनेक्ट २०२२’ या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्य प्रायोजक विनोद मांडोत, जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष गणपतराज चौधरी, जीतो अॅपेक्सचे अध्यक्ष सुरेश मुथा, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका, जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला, रोम झोनचे अध्यक्ष कांतिलाल ओसवाल, रोम जेएटीएफचे अध्यक्ष इंदर जैन, प्रकाश धारिवाल, रवींद्र दगड, अजय मेहता, पंकज कर्नावट, चेतन भंडारी, संचालक इंदर छाजेड, रमेश गांधी, अॅड. एस. के. जैन, विजयकांत कोठारी, देवीचंद जैन आदी उपस्थित होते.
श्री. शरद पवार म्हणाले, ‘‘देशात माझे अनेक जैन मित्र आहेत, त्यांनी देशासाठी मोठे काम केले आहे. यात भवरलाल जैन यांनी शेतीसाठी नवे तंत्रज्ञान आणले. पूर्वी बिर्ला, टाटा यांचेच देशात नाव घेतले जात होते. आता माझे मित्र गौतम अदाणी हे देशाला पुढे घेऊन जात आहेत. विमानसेवा, परदेशात आयात-निर्यात, पायाभूत सुविधा या क्षेत्रात काम करीत आहेत.’’ जैन समाजातील नवी पिढी प्रशासकीय सेवेत, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत मोठ्या पदावर काम करीत आहेत.’’ याकडेही पवार यांनी लक्ष वेधले.
जैन समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला; पण त्यात संजय नहार यांचाही सत्कार केला, याचाही आनंद वाटला. काश्मिरी मुलांना पुण्यात आणून शिक्षण दिले. सरहद, वंदे मातरम् संघटनेच्या माध्यमातून देशाच्या एकतेसाठी नहार यांनी केलेले काम महत्त्वाचे आहे, असेही शरद पवार म्हणाले. या वेळी पुरस्कार विजेत्यांतर्फे विजय भंडारी यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक रवींद्र दुगड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजेश सांकला यांनी पुरस्कार विजेत्यांची ओळख करून दिली.
चौकट
बाजारपेठ स्थलांतर करण्यास केला होता विरोध
पुण्यातील मुख्य बाजारपेठ नाना पेठेत होते; पण तेथील जागा अपुरी पडत असल्याने ही बाजारपेठ गुलटेकडी येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. पण, त्या वेळी व्यापाऱ्यांनी विरोध करून १० दिवस बाजारपेठ बंद ठेवली होती. त्या वेळी ज्येष्ठ व्यापाऱ्यांना सोबत घेऊन चर्चा करून समजून काढण्यात आली. मार्केट यार्ड बाजारपेठ स्थलांतरित झाल्यावर पुढील पाच-सहा वर्षांत येथील व्यवसायात प्रगती झाली. व्यापाऱ्यांनी जमीन घेऊन घरे बांधली. तुमची प्रगती झाली, आयुष्यात खुशी आली, याचा मला आनंद आहे. आता याच बाजारपेठेच्या भागात जितोची परिषद होत आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी आठवणींना उजाळा दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Pct22b12769 Txt Kolhapur1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..