
दोन वर्षानी भरली श्रावण षष्ठी यात्रा..
१९७४
१९७२
१९७३
चांगभलंच्या जयघोषाने डोंगर दुमदुमला!
श्रावण षष्ठी यात्रा; सकाळी घामाच्या आणि संध्याकाळी अनुभवल्या श्रावण सरींच्या धारा
निवास मोटे ः सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर ता. ३ ः जोतिबाच्या नावानं चांगभलं.. महादेव काळभैरव श्रीयमाईदेवी व चोपडाईदेवीच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात येथील आदिमाया चोपडाई देवीच्या श्रावणषष्ठी यात्रेसाठी तीन लाखाच्या वर भाविकांनी हजेरी लावली. दिवसभर कडक उन्ह व दुपारी चारनंतर जोरदार पाऊस, दाट धुके थंडी वारा हे चित्र भाविकांनी डोंगरावर अनुभवले. रात्री साडेआठनंतर पाऊस थांबला. त्यानंतर मंदीर परिसरात भाविकांची गर्दी वाढली.
कोरोनामुळे दोन वर्षापासून श्रावणषष्ठी यात्रा झाली नाही. त्यामुळे यात्रेत मुंबई पुणे सातारा बेळगांव या भागातील भाविकांनी गर्दी केली. रात्रभर डोंगरावर भाविकांची झुंडी येतच राहिल्या. उद्या (ता. ४) सकाळी सहा वाजता धुपारती सोहळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. षष्ठी यात्रेची वैशिष्ट्ये म्हणजे ही यात्रा रात्रभर भरते. भाविक उपवास करून येतात व उपवास दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांच्या घरी सोडतात. मंदिराभोवती भाविकांच्या रात्रभर दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. रात्री आठनंतर डोंगरावर गर्दी झाली. पुजारी लोकांची घरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे दुपारनंतर डोंगरावर तळ ठोकून होते. त्यांनी बंदोबस्ताची पाहाणी केली. आज डोंगरावर कडक पोलिस बंदोबस्त होता. मंदिराला तर छावणीची स्वरूप आले होते. मंदिरासह संपूर्ण गावातून श्वान फिरवण्यात आले. घाटातही ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात होता. यात्रेच्या सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवडे अधिक्षक दीपक मेहतर सहाय्यक पोलिस निरिक्षक शितलकुमार डोईजड, सरपंच राधा बुणे उपसरपंच शिवाजीराव सांगळे तसेच सर्व विभागांचे अधिकारी डोंगरावर तळ ठोकून होते.
श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटातील महापूजा बांधली तर आदिमाया चोपडाई देवीची वैशिष्ट्यपूर्ण अशी महापूजा बांधली. रात्रभर देवीचा जागा सोहळा झाला. दरम्यान, दुपारी चार ते रात्री साडेआठ पर्यंत डोंगरावर मुसळधार पाऊस पडला त्यामुळे भाविकांची त्रेधात्रिपीठ उडाली. सर्रास भाविकांना भिजतच दर्शन घ्यावे लागले.
रात्रभर डोंगर जागा..
श्रावणषष्टी यात्रेच्या निमित्ताने जोतिबा डोंगर जागा होता. दोन वर्षानंतर यात्रा होत असल्यामुळे भाविकांनी मंदिर परिसर तसेच पुजाऱ्यांची घरे मिळेल तेथे आसरा घेतला. डोंगरावरील महिलांची रात्रभर पुरणपोळी करण्याची लगबग सुरू होती. पहाटे धुपारती सोहळा झाल्यानंतर भाविक उपवास सोडून अंगारा, प्रसाद घेऊन परतीच्या मार्गाला लागले.
Web Title: Todays Latest Marathi News Phj22b01089 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..