Navaratri Festival 2022 : जोतिबा मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jyotiba Dongar Navaratri Festival 2022
जोतिबा डोंगर नवरात्रोत्सव.. महापूजा..

Navaratri Festival 2022 : जोतिबा मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ

जोतिबा डोंगर : येथील श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग मंदिरात मंगलमय वातावरणात आज शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. तुतारी ढोल सिंग सनई या वाद्यांच्या गजरात सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत घटस्थापनेचा विधी झाला. पहाटेपासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला. जोतिबा देवासह सर्व देव-देवतांना महाभिषेक घातला. केदार स्त्रोत्र केदार महिमा यांचे पठण झाले. दख्खनच्या राजा श्री जोतिबा देवाची आज नागवेलीच्या पानातील राजेशाही थाटातील बैठी महापूजा दहा गावकर व पुजारी यांनी बांधली.

घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजता मूळ माया श्री यमाईदेवी, तुकाईदेवी भावकाई देवी मंदिरात घटस्थापना करण्यासाठी धुपारतीसह पुजारी ग्रामस्थ देवसेवक, देवस्थान समितीचे अधीक्षक दीपक मेहतर व कर्मचारी भाविक उंट घोडा या मानाच्या प्राणी व लवाजम्यासह मिरवणुकीने गेले. श्री यमाई मंदिरात घटस्थापनेचा विधी झाल्यानंतर कर्पूरेश्वर तलावाजवळील तुकाई मंदिरात घटस्थापनेचा विधी झाला. भावकाई मंदिरात घटस्थापना झाली. दुपारी धुपारती सोहळा झाला. प्रवीण डबाणे यांनी तोफेची सलामी दिली. मंदिरात भजनी मंडळांचा कार्यक्रम झाला. जोतिबा देवाचा जागर सोहळा रविवारी (ता. २) होणार आहे. तर पहिला पालखी सोहळा ४ तारखेला होणार आहे.

विद्युत रोषणाई
मंदिर व परिसर आकर्षक विद्युत रोषणाई उजळून निघाला आहे. ही रोषणाई विजयादशमीपर्यंत ठेवणार असल्याचे देवस्थानचे अधीक्षक दीपक मेहतर यांनी सांगितले. दरम्यान, भाविक येण्यास प्रारंभ झाला. मंदिर परिसरात कोडोलीचे सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.