
पोहाळेची अंकीता थायलंड मध्ये निघाली वर्ल्डकप खेळायला..
02072
अंकिता साळोखे
अंकिता साळोखे खेळणार थायलंड
तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड; ग्रामस्थांसह संस्थांकडून आर्थिक मदत
निवास मोटे : सकाळ वृत्तसेवा
जोतिबा डोंगर, ता. ११ : घरची परिस्थिती गरीबीची. प्रचंड जिद्द मेहनत करून तिने तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतले. आजपर्यंत तालुका, जिल्हास्तरावर चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय स्पर्धा ही जिंकल्या. बँकॉक (थायलंड) या ठिकाणी होणाऱ्या जुनिअर तलवारबाजी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता तिची निवड झाली. तिचा पोहाळे ते थायलंड पर्यंतच प्रवास खडतर आहे. परदेशात अंकिताच्या तळपणाऱ्या तलवारीकडे आता कोल्हापूर वासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. यासाठी तिला ग्रामस्थांसह विविध संस्थांनी आर्थिक मदत केली.
भारतातून या स्पर्धेसाठी बारा मुली सहभागी होत आहेत. त्यात पोहाळेच्या अंकिताचा समावेश आहे. तिने ओडिसा या ठिकाणी झालेल्या ३० व्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण देशात सोळावी रँक प्राप्त केली. तिच्या याच कारकिर्दीमुळे तिची बँकॉक येथे होणाऱ्या जुनिअर तलवारबाजी वर्ल्डकप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आतापर्यंत तिने सात वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे.
ती सध्या श्रीपतराव चौगुले आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमध्ये अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे या ठिकाणी झालेले आहे. वडील शेती काम करतात, तर आई गृहिणी आहे. सध्या ती औरंगाबाद या ठिकाणी स्पोर्टस् ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) येथे सराव करत असून तिला या वर्ल्डकप स्पर्धेसाठी लागणारी एक लाखाची आर्थिक मदत पोहाळे गावातील अनेक ग्रामस्थ, संस्था व व्यक्तींनी केली. त्याचबरोबर ‘साई’चे प्रशिक्षक श्रिया सिंग, तुकाराम म्हेत्रे, तसेच क्रीडा शिक्षक दीपक क्षीरसागर, मुख्याध्यापक परशराम आंबी, शिक्षक, नवनाथ शिक्षण संस्थेच्या पदाधिकांऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
अंकिता पोहाळे तर्फ आळते (ता. पन्हाळा) या गावातील असून आतापर्यंत अंकिताने आठ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
------------
कोट
पोहाळेच्या अंकिताची तलवारबाजी अप्रतीम आहे. कष्ट व जिद्दीच्या जोरावर तिने तलवारबाजीत चमकदार कामगिरी केली आहे. आता तर वर्ल्डकपमध्ये खेळत आहे. पूर्ण गावाला तिचा अभिमान आहे.
- दीपक क्षीरसागर, क्रीडा शिक्षक, नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते
............