
सत्तारुढ वरुटे विरोधात विरोधकांचे एकीचे प्रयत्न
सत्तारूढ वरुटे गटाविरूद्ध विरोधकांचे एकीचे प्रयत्न
शिक्षक बँक निवडणुकीच्या हालचालींना गती; करवीरमध्ये इच्छुकांची गर्दी
राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या निवडणुकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे निवडणूक हालचालींना वेग आला आहे. बँकेच्या सत्तारूढ वरूटे गटाविरोधात एकच पॅनेल करण्यासाठी इतर सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत. संयुक्त आघाडी करण्यासाठी त्यांच्यात चर्चा पे चर्चा सुरू आहेत. शिक्षक समिती, थोरात गट शिक्षक संघ व कास्ट्राईब या तीन संघटना सध्या एकत्र आल्या आहेत. पुरोगामी संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. विरोधकांनी एकच पॅनेल केल्यास निवडणूक लक्षवेधी होईल.
शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांची १३ वर्षांपासून बँकेवर सत्ता आहे. गत निवडणुकीत तिरंगी लढत झाली. वरुटे पॅनेलला बारा तर विरोधकांना पाच जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीत तीन पॅनेल झाली की सत्ताधाऱ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे विरोधात एकच सक्षम पॅनेल करण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.
सर्व विरोधी संघटना एकत्र आल्या, तर मात्र करवीर तालुक्यात कोणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्न निर्माण होईल. महिला उमेदवारही मोठ्या संख्येने इच्छुक आहेत. समितीच्या महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे, संचालिका लक्ष्मी पाटील, शारदा वाडकर, लता नायकवडे, हेमलता बनकर, विद्युलता पाटील, अश्विनी पाटील, पद्मजा मेढे आदी इच्छुक आहेत. पुरोगामीतर्फे शारदा वाडकर यांचे नाव चर्चेत आहे. राखीव पाच जागांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. हे उमेदवार ठरविताना पॅनेल प्रमुखांना कसरत करावी लागणार आहे. सत्तारूढविरोधात एकत्र येण्यासाठी विरोधक चर्चा करत असताना सत्तारूढ गटाने मारुती दिंडे (करवीर), बाबा साळोखे (शाहूवाडी), बबन केकरे (पन्हाळा), मायकल फर्नांडिस (आजरा), श्रीपती तेली(गगनबावडा), राजेंद्र मांडेकर (गडहिंग्लज), बी. एस. पाटील (भुदरगड) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते प्रचाराला लागले आहेत.
कोट
शिक्षक बँकेत सभासदाभिमुख केलेले काम व शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून केलेले प्रयत्न, यामुळे सत्तारूढ पॅनेल मताधिक्क्याने विजयी होईल.
- राजाराम वरुटे, सत्तारूढ पॅनेल प्रमुख
कोट
थोरात गट संघ, शिक्षक समिती व कास्ट्राईब संघटना एकत्रितपणे निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. एकास एक लढत होण्यासाठी इतर समविचारी संघटनांशीही चर्चा सुरू आहे.
अर्जुन पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती
- रघुनाथ खोत, थोरात गट संघ
कोट
सन्मानजनक युती झाली तर एकत्र लढणार, अन्यथा समविचारी घटकांना सोबत घेऊन पुरोगामी संघटना पॅनेल उभे करणार आहे.
- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी संघटना.
कोट
सभासदांचे हित जोपासणाऱ्या सर्वसामान्य शिक्षकांना एकत्र करून निवडणुकीत पॅनेल उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-कृष्णात धनवडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना