
शिक्षक बँकेसाठी करवीरमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
लोगो- शिक्षक बँक निवडणूक
उमेदवार निवडीत संघटनाप्रमुखांची डोकेदुखी
राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी तिरंगी लढत होणार असून, करवीर तालुक्यात इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी करवीर तालुका केंद्रस्थानी राहिला. करवीर तालुक्यात सर्वाधिक ९७६ सभासद आहेत. या वेळीही सर्व संघटनेतून करवीर तालुक्यातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे संघटनाप्रमुखांना येथील उमेदवार निश्चित करताना अडचणी येत आहेत. गेल्या निवडणुकीत १७ संचालकांपैकी करवीर तालुक्यातील पाच संचालक विजयी झाले होते.
इतर तालुक्यांपेक्षा करवीर तालुक्यात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. सत्ताधारी वरुटे गटाने मारुती दिंडे यांची, तर पुरोगामी संघटनेने संचालक प्रसाद पाटील यांची करवीर तालुक्यातील सर्वसाधारण गटातील उमेदवारी जाहीर केली. शिक्षक समिती व थोरात गट संघाच्या संयुक्त पॅनेलकडून उमेदवारी मिळविण्यासाठी करवीरमध्ये इच्छुकांची गर्दी झाली आहे. विरोधी पॅनेलकडून करवीर सर्वसाधारण गटातून शिक्षक समितीचे जिल्हा नेते कृष्णात कारंडे, थोरात गट संघाचे राज्य संपर्कप्रमुख एस. व्ही. पाटील, करवीर तालुकाध्यक्ष रावसाहेब पाटील, पदवीधर संघटनेचे दीपक जगदाळे, माजी संचालक सुरेश कांबळे इच्छुक आहेत. कारंडे व एस. व्ही. पाटील यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. दोघांनीही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास व प्रचारास सुरुवात केली.
महिला राखीव गटातून विरोधी पॅनेलकडून शिक्षक समितीच्या महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे, संचालिका लक्ष्मी पाटील, पद्मजा मेढे, बिंदिया कांबळे, सत्ताधारी गटातर्फे लता नायकवडे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. यातील काहींनी प्रचारही सुरू केला. अनुसूचित जाती-जमाती गटातून कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष गौतम वर्धन, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे, माजी संचालक सुरेश कांबळे, मागासवर्गीय संघटनेचे तानाजी घरपणकर, राजेश वाघमारे, आर. डी. कांबळे, महावीर कांबळे, संतोष गायकवाड; तर भटक्या विमुक्त जाती गटातून संचालक सुरेश कोळी, मोहन कोळी, दिलीप भोई, इतर मागासवर्ग गटातून जुनी पेन्शनचे सर्जेराव सुतार, प्रकाश सोहनी, पांडुरंग कुंभार, तसेच संभाजी लोहार या प्रमुखांसह अनेक उमेदवार करवीर तालुक्यातून इच्छुक आहेत. करवीरमधील उमेदवार निश्चिती पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी झाल्याने काही संघटनांचे पॅनेल जाहीर करणे रखडले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01252 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..