
विजयाचा चौकार की परिवर्तन
विजयाचा चौकार की परिवर्तन
कोजिमाशित दुरंगी लढत; आमदार जयंत आसगावकर यांच्या भूमिकेकडे लक्ष
राजेंद्र पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशि) निवडणुकीत सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडी विरोधात राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीत दुरंगी सामना होत आहे. सत्ताधारी आघाडी विजयाचा चौकार मारणार की लोकशाही आघाडी परिवर्तन करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. २१ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. दहा जुलैला मतदान होणार आहे.
सत्तारूढ आघाडीने अध्यक्ष बाळ डेळेकर, संचालक राजेंद्र रानमाळे, अनिल चव्हाण या तीन संचालकांना व शीतल हिरेमठ अन ऋतुजा पाटील या शहरातील दोन महिलांना उमेदवारी दिली आहे. विरोधी आघाडीने शाळा कृती समितीचे राज्य कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, भुदरगडच्या माजी सभापती आक्काताई नलवडे, गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे यांचे चिरंजिव विक्रमसिंह मोरे, माजी संचालक बाळासाहेब चिंदगे यांच्यासह नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान संचालक संदीप पाटील व जयश्री पाटील हे पती-पत्नी अपक्ष आहेत.
संस्था बिनविरोध करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर चर्चा झाली; परंतु जागावाटपात समझोता न झाल्याने निवडणूक लागली आहे. विरोधी आघाडीचे उघड नेतृत्व आमदार जयंत आसगावकर करणार का याकडे लक्ष आहे. ते रिंगणात उतरल्यास आरोप-प्रत्यारोपांचे, शह-काटशहाचे राजकारण रंगणार आहे. सत्ताधारी आघाडीची पूर्ण धुरा दादा लाड यांच्यावर आहे. बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे यांची साथ आहे. विरोधी आघाडीची धुरा संभाजीराव खोचरे, बी. डी. पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, मिलिंद पांगिरेकर, व्ही. जी. पोवार, उदय पाटील, के. के. पाटील सांभाळणार आहेत.
सतरा वर्षांपासून शिक्षक नेते दादा लाड यांची सत्ता आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी विरोधात इतर सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन विरोधात राजर्षी शाहू महाआघाडी उभा केली होती. त्यावेळी सत्ताधारी आघाडीला सतरा तर विरोधी आघाडीला चार जागा मिळाल्या होत्या. लाड यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. संस्थेच्या राजकारणात गेल्या चार वर्षांत मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे दादा लाड यांची स्वाभिमानी आघाडी विजयाचा चौकार मारणार की लोकशाही आघाडी सत्तांतर घडवणार याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
समीर घोरपडे, एच.आर.ना डच्चू
सत्ताधारी आघाडीचे समर्थक माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक एच. आर. पाटील यांना सत्ताधारी गटाने तर विरोधी आघाडीने विद्यमान संचालक समीर घोरपडे यांना डच्चू दिला. उमेदवारीपासून डावलल्याने दोघेही नाराज आहेत. त्यातून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Phl22b01280 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..