
ओढ्याकाठी कचऱ्याचे ढीग
01362
------------
ओढ्याकाठी कचऱ्याचे ढीग
ग्रामीण भागातील चित्र; तत्काळ उचलण्याची आवश्यकता
सचिनकुमार शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
पट्टणकोडोली, ता. १३ : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत असणाऱ्या लहान-मोठ्या ओढ्यांच्या काठांवर कचऱ्याचे ढीग अद्यापही पडलेले आहेत. त्यामुळे ओढे तुंबून मार्ग बंद पडण्यास कारणीभूत ठरत आहेत. तसेच यामुळे नद्यांच्या प्रदूषणात भर पडणार आहे. त्यामुळे ते लवकरात लवकर हटवणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कचरा उठवण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेश देण्याची आवश्यकता आहे.
नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात नालेसफाई काही दिवसांपूर्वी केलेली होती. जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्ह्याला भेट दिल्यानंतर अजूनही काही नाल्यांच्या सफाईचे आदेश दिले. नाले, गटारे तुंबून रस्त्यावर पाणी येऊ नये यासाठी ही सफाई मोहीम राबवण्यात आली होती. त्याचा परिणाम नदी प्रदूषण रोखण्यावर झाला आहे. एका बाजूला ही सफाई सुरू असताना दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायती हद्दींमध्ये मात्र सफाई झालेली नाही. अनेक गावांमध्ये लहान-मोठ्या ओढ्यांच्या काठांवर नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. कोणत्याही ग्रामपंचायतीने ते ढीग हलवण्याची तसदी घेतलेली नाही. सध्या पावसाचा जोर वाढल्याने कचरा ओढ्यात, रस्त्याकडेच्या चरींमध्ये जाऊ लागला आहे. अद्याप अनेक ओढे दुथडी भरून वाहत नसल्याने अनेक ठिकाणचा कचरा तसाच सडत पडला आहे. तो हटवणे गरजेचे आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pkd22b00935 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..