पट्टणकोडोली यात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पट्टणकोडोली यात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती.
पट्टणकोडोली यात्रेस लखो भाविकांची उपस्थिती.

पट्टणकोडोली यात्रेस लाखो भाविकांची उपस्थिती.

sakal_logo
By

विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं...
---
पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेस प्रारंभ
पट्टणकोडोली, ता. १५ : ‘विठ्ठल-बिरोबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात, ढोल-कैताळांच्या निनादात, भंडाऱ्याच्या अखंड उधळणीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल बिरदेवाच्या यात्रेस प्रारंभ झाला.


आज सकाळी प्रथेपरंपरेनुसार विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. मानाच्या दुधारी तलवारींचे गावचावडीत पूजन करण्यात आले. या तलवारी मिरवणुकीने भानस मंदिर व श्रींचे मंदिरात पूजन करून फरांडेबाबांकडे मार्गस्थ करण्यात आल्या. प्रकाश पाटील, रणजित पाटील, जोशी, आवटे, गावडे, कुलकर्णी, चौगुले आदी मानकरी व धनगर समाज पंचमंडळींनी फरांडेबाबांना भेटून मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्वीकारून फरांडेबाबा मानाच्या दगडी गादीवरून उठले. फरांडेबाबांनी हेडाम नृत्य केले. या वेळी जमलेल्या लाखो भाविकांनी बाबांच्या अंगावर भंडारा, खारीक-खोबरे, बाळ लोकर यांची उधळण केली. त्‍यानंतर फरांडेबाबांनी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले व तिथे देववाणी केली.


दरम्यान, उबदार कपड्यांची दुकाने, भला मोठा घोंगडी बाजार, ढोल व ढोलांच्या कड्यांचा बाजार यांची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. सकाळपासून यात्रा परिसरात अनेक ठिकाणी भाविक धनगरी ओव्यांचे कार्यक्रम करीत आहेत; तर फरांडेबाबांच्या गादीसमोर अनेक भक्तगण ढोल व कैताळांचा निनाद करीत होते. यात्रेची गर्दी व कार्यक्रम टिपण्यासाठी १५ हून अधिक ड्रोन कॅमेरे यात्रा परिसरावर फिरत होते. यात्रेतील मुख्य कार्यक्रम आज झाला असला, तरी यात्रेतील धार्मिक विधी अजून दोन दिवस चालणार आहेत.
..........
भंडारा व लोकरीसाठी कापडी पिशव्या
फरांडेबाबांवर उधळणीसाठी भंडारा व लोकर भाविक खरेदी करतात. त्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात होता. मात्र, चालू वर्षी जवळपास सर्वच विक्रेत्यांनी छोट्या कापडी बटव्याप्रमाणे पिशव्या ठेवल्या होत्या.