
‘पट्टणकोडोली’ची सुरक्षा रामभरोसे
‘पट्टणकोडोली’ची सुरक्षा रामभरोसे
सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस चौकीची कमतरता
सचिनकुमार शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
पट्टणकोडोली, ता. १४ ः पट्टणकोडोली सुरक्षिततेच्या बाबतीत नेहमीच पिछाडीवर राहिले आहे. गावातील प्रमुख मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, पोलिस चौकीही नाही. त्यामुळे गावची सुरक्षितता रामभरोसेच राहिली आहे.
गावात चांदी उद्योग मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. गावातील शेकडो घरात चांदीची आभुषणे बनवली जातात. तसेच गावालगत पंचतारांकित औद्योगिक वसाहत वसलेली आहे. यामुळे कामगारांसह व्यापाऱ्यांबरोबरच विविध वाहतूक व प्रवासी अशी रहदारी गावांतून असते. गावात अनेक नागरी वस्त्या उदयास आल्या असून गावाचा विस्तार झाला आहे. ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रामुळे रोज शेकडो भाविक गावात येतात. इचलकरंजी, कागल व कोल्हापूर या सर्वांच्या मध्यभागी गाव आहे. अशा विविध कारणांनी गाव महत्त्वपूर्ण आहे. असे असतानाही गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नजर ठेवणारा तिसरा डोळा अर्थात ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ गावातील प्रमुख ठिकाणी बसवलेले नाहीत. त्यासाठी शासकीय विभागाने प्रयत्न केलेले नाहीत. ग्रामपंचायतीने फक्त मराठी शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मंदिर परिसरातही कॅमेऱ्यांची नजर आहे.
मात्र, गावात प्रवेशणारे पाच वेगवेगळे मार्ग असताना एकाही मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला नाही. गावात पोलिस चौकी नसल्याने पूर्णवेळ पोलिस कर्मचारी नसतो. यामुळे गावाची सुरक्षा रामभरोसेच असल्याचे म्हणावे लागेल. हुपरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी लोकवर्गणीतून सीसीटीव्ही बसवण्याचा प्रयत्न केला. गावात त्यासाठी काही ठिकाणी कॅमेरे बसवण्यासाठीचे लोखंडी खांब उभे केले होते. मात्र, हे काम पूर्णत्वापूर्वीच त्यांची बदली झाली.
--------------------
प्रचारात उमेदवारांना विसर
ग्रामपंचायत निवडणुकीचा गावात फड गाजत असतानाच गावाच्या विकासाकाठी वल्गना करणाऱ्या उमेदवारांनाही गावच्या सुरक्षेचा विसर पडला आहे. याकडे विशेष लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
-----------------------------
शेती, उद्योग, व्यवसाय अशा विविध कारणांनी गाव सधन आहे. कोल्हापूर ते विजापूर या प्रमुख मार्गावरील हे महत्त्वपूर्ण गाव असून गावातील रहदारी पाहता गाव सीसीटीव्हीच्या निरीक्षणात असणे अत्यंत गरजेचे आहे.
- राजेश हजारे, बेकरी व्यावसायिक