स्ट्राँग रुमसाठी नवीन घरात स्वतंत्र जागा

स्ट्राँग रुमसाठी नवीन घरात स्वतंत्र जागा

01561
पट्टणकोडोली : नवीन बांधलेल्या घरात स्ट्रॉंग रूमचा दरवाजा बसवताना घेतलेले छायाचित्र.
-------------
स्ट्राँग रुमसाठी नवीन घरात स्वतंत्र जागा
हुपरीसह परिसरातील व्यावसायिकांकडून चांदीच्या सुरक्षेसाठी प्राधान्य
सचिनकुमार शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
पट्टणकोडोली, ता. १३ : चांदी मालासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हुपरी, पट्टणकोडोली, इंगळी, तळंदगे, यळगूड व रेंदाळ या पंचक्रोशीत चांदी सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने स्ट्रॉंग रूमचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. इमारत बांधताना त्यात स्ट्रॉंग रूमची स्वतंत्र जागा ठेवलीच जाते.
भारतीय बाजारपेठेत हुपरीच्या चांदी अलंकारांनी वेगळेच स्थान टिकवून ठेवले आहे. येथील हस्तकला अलंकाराच्या वाढत्या मागणीने येथील कारागिरांची कुशलता अधिक प्रभावी झाली आहे. पंचक्रोशीतील हजारो कुटुंबात हा हस्तकलेचा व्यवसाय केला जातो. त्यामुळे हजारो कुटुंबांमध्ये कच्ची चांदी, अलंकार जोडण्यासाठी आवश्यक असलेले विविध डिझाईनच्या चांदीचे तुकडे प्रत्येक घरात असतात. तसेच या भागात अनेक मोठमोठे चांदी उद्योजकही आहेत. चांदीचे अलंकार बनवून ते मागणीनुसार देशातील वेगवेगळ्या भागात पाठवले जातात.
व्यावसायिक व कारागीर चांदी सुरक्षित ठेवण्यासाठी कित्येक वर्षांपासून लोखंडी कपाटाचा वापर करत होते. मात्र ‘गरज ही शोधाची जननी आहे’ या उक्तीप्रमाणे लोखंडी कपाटाची जागा सध्या स्ट्रॉंग रूमने घेतली आहे. कित्येक जण आहे त्या घरात स्ट्रॉंग रूम बांधून घेत आहेत. तसेच नवीन इमारत बांधकामात इंजिनीअर स्ट्रॉंग रूमसह इमारतीचे डिझाईन करून देत आहेत. सुरक्षेसाठी स्ट्रॉंग रूमला महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वसामान्य व्यावसायिकांपासून मोठ्या व्यावसायिकांमध्ये स्ट्रॉंग रूम बांधल्या जात आहेत.
--------------------------
स्ट्रॉंग रूम ही पूर्णपणे आरसीसी व फायर रेझीटन्स पद्धतीची असतात. तसेच त्याचे मानांकन ही वेगळेच असतात. त्यामुळे ती पूर्णपणे सुरक्षित असल्याने प्रत्येक घरात याची मागणी आहे. आम्ही सध्या बांधकाम आराखडा करताना त्याचे नियोजन करतोच.
-संदीप उलपे, चार्टर्ड सिव्हिल इंजिनीअर, हुपरी
-----------------------
आमच्या गरजेप्रमाणे आतील कप्पे बनवता येतात. तसेच लोखंडी तिजोरीपेक्षा कितीतरी अधिकपटीने सुरक्षित असल्याने स्ट्रॉंग रूमचा सर्रास वापर होत आहे.
-मच्छिंद्र जाधव, चांदी व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com