
वडार समाजाला दोनशे ब्रास रॉयल्टी माफ
वडार समाजाला २०० ब्रास रॉयल्टी माफ
---
आठ वर्षांनंतर शासन निर्णयाचा लाभ; रेंदाळमध्ये आदेश पत्र प्रदान
पट्टणकोडोली, ता. १८ : राज्यातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या वडार समाजाला २०० ब्रास रॉयल्टी माफ करण्याचा शासन निर्णयाचा लाभ तब्बल आठ वर्षांनंतर वडार समाजाला देण्यात आला.
वडार समाजातील पारंपरिक दगड फोडणी करणाऱ्या कुटुंबांना २०० ब्रास रॉयल्टी माफ करण्याचा शासन निर्णय ७ मार्च २०१५ ला झाला होता. मात्र, आठ वर्षे याबाबत समाजाने पाठपुरावा करूनही लाभ मिळत नव्हता. गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थीना ओळखपत्र देण्यात आले. त्यानंतर प्रक्रियेला गती येऊन रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील कुटुंबांना शासनाने प्रायोगिक तत्त्वावर आदेश पत्र दिले. अप्पर तहसीलदार शरद पाटील यांनी आदेशपत्र दिले. रुई येथील राहुल धोत्रे, नागाप्पा वडर, हणमत वडर, अशोक वडर, रेंदाळचे दिलीप पोवार यांनाही शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र देण्यात आले. अप्पर तहसीलदार पाटील व अव्वल कारकून मेजर देसाई आदींनी विशेष प्रयत्न केले.