उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रजमध्ये जमावाचा हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रजमध्ये जमावाचा हल्ला
उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रजमध्ये जमावाचा हल्ला

उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रजमध्ये जमावाचा हल्ला

sakal_logo
By

उदय सामंत यांच्या
गाडीवर पुण्यात हल्ला
कात्रज चौकात जमावाचे कृत्य; मोटारीची काच फुटली
पुणे, ता. २ ः शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटातील नेत्यांतील शाब्दिक चकमकीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना मंगळवारी रात्री बंडखोर नेते आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज येथे जमावाने हल्ला केल्याने खळबळ उडाली.

कात्रज येथे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर त्याच कात्रज चौकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मार्गस्थ झाला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा शंकर महाराज मठाकडे गेल्यानंतर उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात सिग्नल लागल्याने थांबले. सामंत यांना गाडीत पाहताच, जमावाने ‘‘गद्दार गद्दार...’’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. जमावाने सामंत यांच्या गाडीला घेराओ घालण्याचा प्रयत्न करत गाडीवर हाताने, चपलांनी मारण्यास सुरुवात केली. हाताच्या जोरदार ठोशांमुळे सामंत यांच्या गाडीची काच फुटली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून सौम्य लाठीमार करून जमावाला बाजूला काढले आणि सामंत यांची वाट मोकळी करून दिली.
या हल्ल्यानंतर सामंत हे थेट कोथरूड पोलिस ठाण्यात जाऊन तेथे त्यांनी तक्रार दिली. दरम्यान, सामंत यांच्यावर हल्ला झाल्याचा प्रकार कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली. तसेच पोलिस आयुक्तांशीही चर्चा करून घटनेची माहिती घेतली. सामंत यांच्यावर हल्ला झाल्याने पोलिसांनी शहरातील बंदोबस्त कडक केला.

‘‘उदय सामंत यांच्यावर भ्याड हल्ला झाला आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. कोणी जर भडकावू भाषण करून चिथावणी देत असतील तर त्यांच्यावर पोलिस कारवाई करतील. पोलिसांशी या विषयावर मी बोललो आहे.’’
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री


‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा गेल्यानंतर सिग्नल लागल्याने मी थांबलो. शेजारी दोन गाड्या येऊन थांबल्या होत्या. जे काही केले ते गाड्यांमधील १२-१५ जणांनी केले. तेथे शिवसैनिक होते पण त्यांनी काही केले नाही. पोलिसांनी व्हिडिओ तपासून हल्लेखोरांना शोधून काढावे.’’
- उदय सामंत

‘‘या हल्ल्याचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही. पोलिसांनी व्हिडिओ पाहून हल्ले करणाऱ्यांना शोधून काढावे.’’
- संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86172 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top