गाई-म्हशीचे दूध वाढीसाठी ऑक्‍सिटॉसिनचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाई-म्हशीचे दूध वाढीसाठी ऑक्‍सिटॉसिनचा वापर
गाई-म्हशीचे दूध वाढीसाठी ऑक्‍सिटॉसिनचा वापर

गाई-म्हशीचे दूध वाढीसाठी ऑक्‍सिटॉसिनचा वापर

sakal_logo
By

गायी-म्हशीचे दूध वाढीसाठी ऑक्‍सिटॉसिनचा वापर
पश्‍चिम बंगालमधील टोळीला बेड्या; ५३ लाख ५२ हजारांचा औषधांचा साठा जप्त
पुणे, ता. ६ ः गायी, म्हशींच्या दूधवाढीसाठी त्यांना ऑक्सिटोसिन औषध दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. ऑक्सिटोसिनचा साठा करून तो शहर, जिल्ह्यासह राज्यातील गायी-म्हशींच्या मालकांना विक्री करणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, विमानतळ पोलिस ठाणे, अन्न आणि औषध प्रशासन विभाग (एफडीए) यांनी केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये तब्बल ५३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा ऑक्सिटोसिन औषधांचा साठा जप्त करण्यात आला.
समीर अन्वर कुरेशी (वय २९, रा. कलवड वस्ती, लोहगाव), बिश्वजीत सुधांशू जाना (४४, रा. पुरबा बार, विलासपूर, पुरबा मदीनीनपुर, पश्‍चिम बंगाल), मंगल कनललाल गिरी (२७, तिराईपूर, पश्‍चिम बंगाल), सत्यजित महेशचंद्र मोन्डल (२२, रा. नबासन कुस्तीया पंचायत, पश्‍चिम बंगाल) आणि श्रीमंता मनोरंजन हल्दर (३२, रा. नलपुरकूर, मंडाल, पश्‍चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकारी सुहास सावंत यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील कलवड वस्ती येथे गायी, म्हशी यांचे दूध वाढीसाठी (पाणवणे) ऑक्सिटोसिन औषधांचा वापर केला जात असून या औषधाचा बेकायदा साठ्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. संयुक्त पथकाने शनिवारी लोहगावमधील कलवड वस्ती तेथे छापा टाकत तब्बल ५३ लाख ५२ हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला.

कुरेशीकडून राज्यभरात विक्री
समीर कुरेशी मुख्य संशयित आहे. त्याने इतर साथीदारांशी संगनमत करून ऑक्सिटोसिनचा साठा केला होता. तेथूनच कुरेशी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील गोठे मालकांना ऑक्सिटोसिनचा पुरवठा करीत होता. ते इंजेक्‍शनद्वारे गायी, म्हशींना देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. ऑक्सिटोसिन हार्मोन असून त्याचा वापर प्रसूती सुरळीत करण्यासाठी केला जात असल्याचे औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी सांगितले.

ऑक्‍सिटोसीनमुळे मानवी शरीरावर होणारे परिणाम
अशक्तपणा, दृष्टीविकार, पोटाचे आजार,
नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेस रक्तस्राव
अनैसर्गिक गर्भपात, श्वसन व त्वचेचे विकार