
पत्रकार परिषद
बोम्मईंना प्रतिउत्तर देण्यास
शिंदे, फडणवीस घाबरतात
जयंत पाटील; केंद्राकडून राज्य सरकारवर दबाव
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. १३ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना प्रतिउत्तर देण्यास घाबरत आहेत. येत्या काही दिवसांत कर्नाटक विधानसभा निवडणूक असल्याने दिल्लीतून राज्य सरकारवर सीमाप्रश्नाबाबत बोलण्यास दबाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आज येथे पत्रकार परिषदेत केला.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘हिवाळी अधिवेशन दोन आठवड्यांत गुंडाळण्याचे धोरण भाजपने आखले आहे; मात्र, राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी महाविकास आघाडीने तीन आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना पारदर्शी राबवून त्यामधील त्रूटी दूर कराव्यात. कर्नाटक मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्लीला जाणार आहेत. या प्रश्नाबाबत राज्य सरकारला दिल्ली दरबारी जाण्यास उशीर झाला असून, याबाबत महाराष्ट्र सरकारची बोटचेपी भूमिका आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बेळगावला जाऊन सीमाभागातील नागरिकांना धीर देण्याचे काम करत आहेत.’’
गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केली जात असून, या विरोधात मुंबईत महाविकास आघाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा अभूतपूर्व होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याचे व्हिडिओ दाखविल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांना पोलिस ठाण्यात डांबून ठेवण्यात आले होते. पत्रकारांवर छायाचित्रे व बातमी देण्यासही दबाव येत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे. कॉँग्रेसने काढलेली भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, या यात्रेमुळे कॉँग्रेसमध्ये उत्साह आला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत मतांची विभागणी टळल्याने कॉँग्रेसची एकहाती सत्ता आली. मात्र, गुजरातमध्ये आम आदमी पक्षामुळे कॉँग्रेसच्या मतांची विभागणी झाल्याचे निकालावरून दिसत आहे. दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील टोलविरोधात अधिवेशनात आवाज उठविणार आहे, असेही ते म्हणाले.
पवारांच्या सुरक्षिततेबाबत दक्ष राहा!
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेऊन सुरक्षा यंत्रणांना शरद पवार यांच्या सुरक्षिततेबाबत दक्ष राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते भाजपचा हस्तक
गुणरत्न सदावर्ते भाजपचे हस्तक असून, त्यांचा खुबीने वापर करून घेत आहेत. जे भाजपला करून दाखवायचे आहे; परंतु बोलता येत नाही ही वक्तव्ये सदावर्तेंच्या तोंडून बोलायला लावायचे काम भाजप करत आहे. त्यामुळे सदावर्ते यांनी पुण्यातील मोर्चाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्याची केलेली मागणी एकप्रकारे भाजपची असल्याचा रोख जयंत पाटील यांचा होता.