‘संस्कारक्षम व्यक्ती करतील राष्ट्राचा विकास’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संस्कारक्षम व्यक्ती करतील राष्ट्राचा विकास’
‘संस्कारक्षम व्यक्ती करतील राष्ट्राचा विकास’

‘संस्कारक्षम व्यक्ती करतील राष्ट्राचा विकास’

sakal_logo
By

पुणे : प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लिखित ‘इंडियन फिलॉसॉफी’ या पुस्तकाच्या डॉ. अनुपमा क्षीरसागर यांनी केलेल्या ‘भारतीय तत्त्वज्ञान - खंड १ व‌ खंड २’ या मराठी अनुवादित ग्रंथांचे प्रकाशन करताना (डावीकडून) नितीन गडकरी, डॉ. अशोक मराठे आणि डॉ. क्षीरसागर.

संस्कारक्षम व्यक्ती करतील राष्ट्राचा विकास
नितीन गडकरी; ‘इंडियन फिलॉसॉफी’च्या मराठी अनुवादाचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ११ ः ‘‘ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या बाबी महत्त्‍वाच्या आहेतच. मात्र, तत्त्‍वज्ञान आणि संस्कार यांना पर्याय नाही. तत्त्‍वज्ञानात व्यक्तिगत जीवनासह सामाजिक आणि राष्ट्रीय जीवन बदलण्याची ताकद असते. त्यामुळे भौतिक प्रगतीसह संस्कारक्षम व्यक्ती तयार व्हायला हवेत, त्यातूनच राष्ट्राचा विकास होणार आहे’’, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लिखित ‘इंडियन फिलॉसॉफी’ या ग्रंथाच्या ‘भारतीय तत्त्वज्ञान’ या मराठी अनुवादाच्या प्रकाशन प्रसंगी गडकरी बोलत होते. डॉ. अनुपमा क्षीरसागर यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला असून प्रणवतीर्थ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दोन खंडात याचे प्रकाशन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक डॉ. अशोक मराठे, अनुवादिका डॉ. क्षीरसागर आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला रोजगार कसा मिळेल, नोकरी कशी मिळेल, असाच विचार बहुतांश लोक करतात. ते काही अंशी बरोबर आहे. मात्र त्यामुळे शिक्षणात संस्कारांचे महत्त्‍व कमी झाले आहे. आपला इतिहास, संस्कृती, समाजजीवन, कुटुंब पद्धती आणि संस्कार, ही आपली मोठी ताकद आणि आपले वैशिष्ट्य आहे. विश्वाचे कल्याण करणारे हे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळेच त्याचे जगाला आकर्षण आहे. पण आपण आपले विचार, तत्त्वज्ञान समजण्यात कमी पडलो. आपल्याकडे विचार भिन्नता ही समस्या नाही, तर विचार शून्यता ही समस्या आहे.’’

डॉ. क्षीरसागर म्हणाले, ‘‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी लिहिलेल्या या ग्रंथाची गणना अभिजात वाङ्मयात केली जाते. भारतीय संस्कृती आणि तत्त्‍वज्ञान जगासमोर मांडण्यासाठी हा ग्रंथ अतिशय महत्त्‍वाचा होता. डॉ. राधाकृष्णन यांचे शब्द अर्थवाहीपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न अनुवादातून केला आहे.’’