काशीळ दरोडा अटक

काशीळ दरोडा अटक

कुरिअर कंपनीकडील दागिने
लुटणाऱ्या टोळीला अटक
सर्व सात तरुण कोल्हापूर जिल्ह्यातील
सकाळ वृत्तसेवा
सातारा, ता. २९ : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर एका कुरिअर कंपनीच्या वाहनाला अडवून त्यातील सोन्या-चांदीच्या नव्या दागिन्यांची लूट केल्याप्रकरणी सात सराईत संशयितांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज, गुन्ह्यात वापरलेली गाडी व मोबाईल असा सुमारे २४ लाख ७२ हजार ८२० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
सरफराज सलीम नदाफ (वय ३४), मारुती लक्ष्मण मिसळ (२१), समीर धोंडिबा मुलाणी (२९) व रियाज दस्तगीर मुजावर (३३, सर्व रा. कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), सूरज बाजीराव कांबळे (२४) व करण सयाजी कांबळे (३४, दोघे रा. सावर्डे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) व गौरव सुनील घाटगे (२३, रा. मिणचे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
संतकुमार परमार व गोलू दिनेश परमार हे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅनमध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. रविवारी पहाटे काशीळ (ता. सातारा) गावच्या हद्दीत महामार्गावरील पुलावर त्यांच्या गाडीला मोटार आडवी मारून चोरट्यांनी वेदनाशामक औषधाच्या स्प्रेचा फवारा मारून त्यांना जबरदस्तीने खाली उतरविले होते. तसेच सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स गाडीसह जबरदस्तीने घेऊन गेले. याबाबत संतकुमार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती.
तांत्रिक विश्‍लेषण व मिळालेल्या माहितीच्या आधारे काही संशयित पुणे येथे असल्याची माहिती समोर आली. त्याबाबत समीर शेख यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना संशतितांबाबत माहिती दिली. देवकर यांनी पुणे ग्रामीण एलसीबीचे निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना संशयितांच्या ठिकाण्याबाबत माहिती दिली. त्यानुसार त्यांनी यवत पोलिस ठाण्याचे निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी कासुर्डी टोलनाका येथे नाकाबंदी केली. त्यामध्ये मोटार व दोन संशयितांना पकडले. पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करून चोरीला गेलेला ऐवज, मोटार व मोबाईल हस्तगत करण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार चार संशयित निष्पन्न झाले. त्यातील तिघांना अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com