अतिक्रमण बाबत चितेवर बसून आत्मदहनाचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिक्रमण बाबत चितेवर बसून आत्मदहनाचा प्रयत्न
अतिक्रमण बाबत चितेवर बसून आत्मदहनाचा प्रयत्न

अतिक्रमण बाबत चितेवर बसून आत्मदहनाचा प्रयत्न

sakal_logo
By

03042
पन्हाळ्यात चितेवर बसून आत्मदहनाचा प्रयत्न.

गायरान जमिनीवर अतिक्रमण प्रकरण
पन्हाळा, ता. २५ ः गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या भूमिहीन लोकांना न्याय मिळावा म्हणून गेले दोन दिवस येथील प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी दखल न घेतल्याने आज राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलकीपड संघर्ष समितीचे अध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी चितेवर बसून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
गेले दोन दिवस अतिक्रमित भूमिहीन लोकांना न्याय मिळावा, यासाठी संघर्ष समितीमार्फत प्रांत कार्यालयासमोर संसार मांडून आंदोलन सुरू होते. दोन दिवसांत शासनाने दखल न घेतल्यास सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला होता. शासकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठ न्यायालयाचा आदेश असल्याने त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही, आंदोलन हे बेकायदेशीर आहे, आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली होती. परंतु, आंदोलकांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. आज दुपारी कार्यालयासमोर चिंता रचून, तिरडी तयार करून शंकर कांबळे चितेवर झोपले. मृत व्यक्तीप्रमाणे त्यांच्यावर गुलाल, पाने, हार, फुले टाकण्यात आली. शंखध्वनी करण्यात आला. मडके फोडून प्रदक्षिणा घालण्यात आली, तसेच महिलांनी हातातील चुडा फोडून शंखध्वनी केला.
आंदोलकांसह शासकीय अधिकाऱ्यांनी आमदार विनय कोरे यांना बोलावून घेतले. ते तब्बल दोन तास उशिरा आले. साहजिकच, आंदोलन करणाऱ्यांच्या रागाचा पारा चढला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. त्यांनी वाहतुकीचा रस्ताच बंद केला. आमदार कोरे येताच आंदोलकांनी घोषणाबाजी करीत कांबळे यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना जिवंतपणी अग्नी देण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी पेटता पलिता काढून घेऊन पुढील अनर्थ टाळला.
विनय कोरे यांनी ‘शंकर ऊठ, मी सांगतो, काय होणार आहे ते,’ असे म्हणत त्यांनी कांबळे यांना चितेवरून खाली घेतले. आणि हा केवळ पन्हाळा तालुक्याचा प्रश्न नाही, तर राज्याचा आहे. दोन लाखांहून अधिक कुटुंबे बेघर होणार आहेत, त्यामुळे या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, तुमची घरे आहेत तशी राहतील, असे स्पष्ट आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.