पाणीदार पन्हाळ्याला पाण्याची समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणीदार पन्हाळ्याला पाण्याची समस्या
पाणीदार पन्हाळ्याला पाण्याची समस्या

पाणीदार पन्हाळ्याला पाण्याची समस्या

sakal_logo
By

03220

पन्हाळ्यात पाणी समस्या
पुरवठ्यात अनियमितता; योजना असूनही लोकांना त्रास
पन्हाळा, ता. ११ : पन्हाळगडी पाणीपुरवठा योजना असूनही महिन्या दोन महिन्यांत तीन ते चार दिवस नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. निवडणुकीत २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या घोषणेला हरताळ फासला जात असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेले दोन दिवस शहरात पाणीपुरवठा न झाल्याने आज काही भागात टॅंकरने नगरपरिषदेला पाणीपुरवठा करावा लागला.

बहुतांश गडावर लोकवस्ती नाही. पण पन्हाळगडी पूर्वीपासून लोकवस्ती आहे ती केवळ पाण्याची सोय आहे म्हणून. समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंच असूनही इथे घरटी विहीर आहे. विहिरीत भरपूर पाणीही आहे, पण मर्यादित घरे वाढत गेली, लोकवस्ती वाढत गेली आणि विहिरी बुजवल्या गेल्या. पर्यटकांच्या संख्येत वाढ होत गेली आणि पाण्याची गरज भासू लागली. कासारी नदीवरून इथे पाणीपुरवठा योजना सुरू झाली. योजना नवीन होती, तोपर्यंत पाणी व्यवस्थित मिळत होते. योजना जुनी होऊ लागली तशा पाणी पुरवठ्यात तक्रारी वाढू लागल्या. दोन वर्षांपूर्वी जॅकवेलची जागा बदलूनही आजही पाण्याची समस्या इथे सुरूच आहे ती केवळ प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे. पूर्वी आसुर्ले येथे जॅकवेल होते. पण तेथे मळीमिश्रीत पाणी येऊ लागल्याने नगरपरिषदेने उत्रे येथे जॅकवेलसाठी जागा खरेदी करून तेथे जॅकवेल बांधले. पण ती ही जागा चुकीची निवडली गेली. फेब्रुवारीपासून कासारी नदीचे पाणी कमी झाले, की जॅकवेल उघडे पडते आणि वरून गेळवडे धरणातून जोपर्यंत पाणी सोडले जात नाही तोपर्यंत पन्हाळ्याचा पाणीपुरवठा खंडित होतो.

चौकट
मोटरी बदलल्या, पाईपलाईन जुनीच
मध्यंतरी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी जुन्या असल्याने जळून गेल्या. मोटारी बदलल्या आहेत, पण काही ठिकाणी पाइपलाइन जुनीच असल्याने वारंवार लिकेज होते आणि पुरवठा बंद होतो. साहजिकच दोष नेमका कुणाला द्यायचा हा अनुत्तरित प्रश्न आहे.

कोट.
कासारी नदीचे पाणी कमी झाल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. आज नदीत पाणी सोडल्याने रविवारी पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल
- रूपाली धडेल, माजी नगराध्यक्षा