
पन्हाळगडावरील ऐतिहासिक वस्तूंचा शोध घ्यायला हवा
03230
पन्हाळा : अंधारबाव परिसरातील तटबंदीत सापडलेला तोफगोळा.
पन्हाळ्यावरील वस्तूंचा शोध घ्यायला हवा
ऐतिहासिक ठेवा जपावा; संशोधकांसह पुरातत्त्वच्या पुढाकाराची गरज
आनंद जगताप : सकाळ वृत्तसेवा
पन्हाळा, ता. २० : इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून नोंद असलेल्या पन्हाळगडावर ऐतिहासिक वस्तूंचा आणि वास्तूंचा खजिना मोठ्या प्रमाणात आहे. तटबंदीच्या दगडात गड ताब्यात घेण्यासाठी गडाखालून डागलेल्या तोफांचे गोळे आजमितीला तटबंदीची स्वच्छता करताना आढळून येतात. तोफेच्या माऱ्याने तटबंदी, बुरुज ढासळून विविध आकार, प्रकारच्या तोफा, तोफगोळे तसेच विविध हत्यारे, गाडले गेल्याची शक्यता आहे. गरज आहे ती इतिहासप्रेमींनी, संशोधकांनी तसेच पुरातत्वत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ती शोधून काढण्याची आणि या ऐतिहासिक वस्तू सर्वांना पाहण्यासाठी खुल्या ठेवण्याची.
रविवारी (ता. १९) राजा शिवछत्रपती कोल्हापूर परिसर या दुर्ग स्वच्छता करणाऱ्या संस्थेच्या शिवप्रेमी युवक-युवतींना येथील तीन दरवाजा शेजारच्या अंधारबाव परिसरातील तटबंदीची स्वच्छता करताना तटबंदीच्या बांधकामात घुसलेला सात किलो वजनाचा तोफेचा लोखंडी तोफगोळा सापडला. गतवर्षी याच संस्थेच्या कार्यकर्त्यांना पुसाटी बुरुजाच्या तटबंदीत एक तोफगोळा सापडला होता, तर फेब्रुवारी २०२१ मध्ये टीम पावनगड या पावनगडावर स्वच्छता करणाऱ्या संस्थेला माहितीचा फलक लावताना काढलेल्या खड्यात तोफगोळ्यांचे भांडारच सापडले होते. मध्यंतरी पन्हाळगडावरील काही तरुणांनी तटबंदी खाली पडलेल्या काही तोफा उचलून गडावर आणल्या.
पन्हाळगडावर जसे शिवप्रेमी तरुण आहेत, तसेच जिल्ह्यातही अनेक तरुण आहेत. अनेक संस्था आहेत. छत्रपती शिवरायांचा पन्हाळगड नेहमी स्वच्छ राहावा, त्यांचे पावित्र्य टिकावे, यासाठी हे शिवप्रेमी काळाच्या ओघात नष्ट पावत चाललेल्या गडाच्या तटबंदीची स्वच्छता स्वयंप्रेरणेने करत आहेत. स्वच्छता करताना सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू पुरातत्त्व खात्याकडे इमानेइतबारे जमा करत आहेत.
पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी या वस्तू ऐतिहासिक धर्मकोठी या पुरातन इमारतीत जमा करून ठेवत आहेत.
-------------
चौकट
विविध ४०६ कुलूपबंद
आज मितीस या इमारतीत पावनगडावर सापडलेले ४०६ विविध आकारांतील तोफगोळे आणि तटबंदीत सापडलेले दोन मोठे तोफगोळे जमा आहेत; पण या इमारतीला सदैव कुलूप असल्याने पर्यटकांना ते पाहता येत नाहीत. पर्यटक येतात, बाहेरून ऐतिहासिक वास्तू पाहतात आणि निघून जातात. याच धर्मकोठी इमारतीत ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय झाले, तरच पन्हाळगडाचा खरा इतिहास, स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेल्या मावळ्यांचा संग्राम कळणार आहे. अन्यथा पन्हाळगड म्हणजे एक चैनी करण्याचा गड एवढीच ओळख भावी पिढीला राहणार आहे. (पूर्वार्ध)