
वाघबीळ घाटातील वळणावरील खोल दरीत गाडी कोसळून अपघात
03331
पन्हाळा ः वाघबीळ घाटातील खोल दरीत कोसळलेली चारचाकी.
...
वाघबीळ घाटात चारचाकी कोसळली
हुबळीचे चौघेजण जखमीः पहाटेच्या दरम्यान अपघात
आपटी, ता.७ ः कोल्हापूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाघबीळ घाटातील नागमोडी वळणावरील खोल दरीत रविवारी पहाटे भरधाव चारचाकी कोसळून झालेल्या अपघातात चौघेजण गंभीर जखमी झाले. इम्रान मुस्ताक सुंडके (वय ३९), महम्मदअली नुरअहमद बिजापूर (वय २२), इम्रान शरीफ बागवान (वय २४), शकीर मुन्ना कितुर (वय २६, सर्व रा. हुबळी,जि.धारवाड) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी (जि.धारवाड) येथील चौघेजण शनिवारी चारचाकी गाडीतून विशाळगडला गेले होते. विशाळगडाहून ते हुबळीला परत येण्यासाठी शनिवारी रात्री निघाले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघबीळ घाटातील नागमोडी वळणावरील खोल दरीत त्यांची गाडी कोसळली. गाडी संरक्षक कठडा तोडून झाडाझुडूपांवर आदळत खोल दरीत कोसळली. अपघातातील चौघेजण जखमी अवस्थेत झाडा-झुडपांचा आधार घेऊन मुख्य रस्त्यावर येऊन खासगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल झाले. पहाटेच्या दरम्यान घडलेल्या या अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते पंडित नलवडे यांना मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती कोडोली व महामार्ग पोलिसांना दिली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.