
जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी वाघवेतीळ दोघांवर गुन्हा दाखल
वाघवेत अॅट्रॉसिटी अंतर्गत
दोघांवर गुन्हा दाखल
आपटी, ता. १४ः पन्हाळा तालुक्यातील वाघवे येथील ग्रामदैवत यात्रेदरम्यान जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी संशयित नितीन बाजीराव पाटील व धीरज राजाराम पाटील यांच्यावर श्रेयश शशिकांत वायदंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वाघवे येथे ग्रामदैवत यात्रा होती. यात्रेमध्ये फिर्यादी व संशयित आरोपी फिरत होते. यात्रा पाहून झाल्यानंतर फिर्यादी वायदंडे यात्रा भरलेल्या मैदानाच्या एका बाजूला उभे होते. त्याचवेळी यात्रा पाहून नितीन पाटील व धीरज पाटील हे तेथून जात असताना त्यांचे लक्ष वायदंडे यांच्याकडे गेले. एकमेकांमध्ये नजरानजर झाल्यानंतर दोघा संशयितांनी वायदंडे यांना आमच्याकडे का पाहतोस म्हणून जातिवाचक शिवीगाळ करत दगडाने व काठीने मारहाण केली. यात फिर्यादी वायदंडे हे डोक्यात व दंडावर मार लागून जखमी झाले. याबाबत वायदंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पन्हाळा पोलिस ठाण्यात अॅट्रॅसिटीखाली गुन्हा दाखल झाला आहे.