
कोयना धरणग्रस्त आंदोलन पुन्हा पालकमंत्र्यांच्या आश्वासनामुळे स्थगित
प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तूर्त स्थगित
डॉ. भारत पाटणकर; पालकमंत्री देसाईंचे पुन्हा बैठकीचे आश्वासन
पाटण, ता. २९ ः कोयनानगर येथे आज सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारोंच्या संख्येने जमलेल्या प्रकल्पग्रस्तांनी राज्य सरकारला सर्व आघाड्यांवर सर्वांगीण युद्ध सुरू करण्याचा इशारा देणारा ठराव डॉ. भारत पाटणकर यांनी मांडला. याला जमलेल्या सर्व प्रकल्पग्रस्तांनी हात वर करून संमती दिली. मात्र, पुन्हा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे डॉ. पाटणकर यांनी जाहीर केले.
या वेळी विनायक शेलार, सीताराम पवार, डी. के. बोडके, सुरेश पाटील, नामदेव उत्तेकर, आनंदा सपकाळ, रमेश शिंदे, बाजीराव पन्हाळकर, प्रकाश भातुसे, मोहन धनवे यांच्यासह सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
एक महिन्याच्या आत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री देसाई यांनी दिले होते. त्यामुळे श्रमिक मुक्ती दलाने आंदोलन स्थगित केले होते. एक महिना झाला तरी बैठक न घेतल्याने आज पुन्हा धरणग्रस्तांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘आंदोलनाला सुरुवात होऊन एक महिना आंदोलनाकडे सरकारने लक्ष दिले नाही. त्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी कोयनानगर येथील आंदोलनाला भेट देऊन बैठक घेतली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची एक महिन्याच्या आत बैठक घेऊ, असे लेखी पत्र दिले. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊन आंदोलनाला सुटी घेण्यात आली. एक महिना उलटूनही बैठक न झाल्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र जमावे लागले आहे.’’
चार दिवसांपूर्वी पालकमंत्री देसाई यांनी फोन करून ठरलेल्या दोन बैठकीपैकी कोयना उच्चाधिकार समितीची बैठक लगेच लावतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पुढील आठवड्यात लावतो. पैकी कोयना उच्चाधिकार समितीची बैठक दोन मे रोजी लावली आहे. मुख्यमंत्र्यांनीही संघटनेचे कार्यकर्ते प्रकाश साळुंखे व शिष्टमंडळाला बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्यावर दुसऱ्यांदा आम्ही विश्वास ठेवत आहोत. या वेळी दिलेले आश्वासन पाळले नाही तर जनता स्वस्थ बसणार नाही. या वेळी मात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या उरावर उभा असलेल्या प्रकल्पांचा ताबा घ्यावा लागेल. पुढील २०२४ चे लक्ष ठेवून बिगर प्रकल्पग्रस्त जनतेला बरोबर घेऊन आम्ही ही सर्व फसवणूक सहन करणार नाही, असा संदेश देऊन त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी दिलीप पाटील, विठ्ठल डांगरे, महेश शेलार, श्रीपती माने, मारुती पाटील, नजीर चौगुले, अनुसया कदम, प्रकाश साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. संतोष गोटल यांनी सूत्रसंचालन केले. सचिन कदम यांनी प्रास्ताविक केले.
००१७९
कोयनानगर ः धरणग्रस्तांशी संवाद साधताना डॉ. भारत पाटणकर.
-----------------