पेठवडगाव:शेतकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:शेतकरी मेळावा
पेठवडगाव:शेतकरी मेळावा

पेठवडगाव:शेतकरी मेळावा

sakal_logo
By

फोटो नं. PTV22B01776
................................

सिलींगचा कायदा तत्काळ रद्द करा
---
अमर हबीब; पेठवडगाव येथे जय शिवराय संघटनेचा शेतकरी मेळावा
पेठवडगाव, ता. ९ : शेतकऱ्यांची चळवळ चालविणाऱ्यांनी सिलींगच्या कायद्याकडे लक्ष दिले नाही. तो कायदा सर्वांत भयानक आहे. या कायद्याच्या अटी फक्त शेतकऱ्यांना आहे. उद्योजकांना तो कायदा नाही. भारतातील ८५ टक्के शेतकरी एक हेक्टरच्या आत आले आहेत. तो दोन एकरात जगाशी कशी स्पर्धा करणार? यासाठी सिलींगचा कायदा तत्काळ रद्द झाला पाहिजे, अशी मागणी किसानपुत्र आंदोलनचे अध्यक्ष अमर हबीब यांनी केले.
येथील जय शिवराय किसान संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते. गो. ज. साळुंखे, माणिक कदम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
हबीब म्हणाले, की महाराष्ट्र सरकारने एका उद्योगासाठी दोन हजार एकर जमीन मोफत देण्याची तयारी केली होती. ही जमीन शेतकऱ्यांची आहे. त्यांच्यावर सिलींग कायदा आहे; परंतु त्या उद्योजकावर सिलींगचा कायदा नाही. शेतकऱ्यांना कंपनी करण्याचे स्वातंत्र्य मिळू शकत नाही. यासाठी सिलींगचा कायदा संपुष्टात आला पाहिजे. या सिलींगच्या कायद्यावर एकाही शेतकरी नेत्याने कधीही बोललेले नाही. हा कायदा असंवैधानिक आहे. तो रद्द करण्याची मागणी अनेक वर्षांची आहे. हा कायदा काही राज्यांत नाही. तो राज्याचा विषय आहे. या कायद्याविरोधात आंदोलनाची गरज आहे. शेतीमाल दर विषयही राज्याकडे होता. परंतु, त्यातही केंद्राने हस्तक्षेप केल्याने शेतकऱ्यांची दराबाबत पिळवणूक होत आहे.
जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजीराव माने म्हणाले, की अनेक वर्षांपासून शेती उत्पादनाचा खर्च वाढत आहे. खतांचे दर ५५ टक्के, मशागतीचे दर, कीटकनाशकाचे दर असे उत्पादनावरील दर ७० टक्क्यांनी वाढले आहेत. जर नोकरदारांना महागाई निर्देशांकाप्रमाणे पगार वाढत असतील, तर शेतकऱ्यांनाही महागाई निर्देशांक लागू करावा. सर्व साखर कारखाने बंद झाल्यावर ‘आरएसएफ’नुसार दर द्यावा, अन्यथा पुढच्या वर्षीच्या हंगामात गाळप परवाना देऊ नये. शेतकऱ्यांना दिली जाणारी बोगस बियाणे, कीटकनाशके, तणनाशके, दूध भेसळ करणारे, काटा मारणारे यांना शिक्षा व्हावी.
या वेळी ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे, अनिल पाटील, दिलीप माणगावे, बी. जी. पाटील, श्रावणी पाटील, शीतल कांबळे, नरसिंगराव गुरव यांची भाषणे झाली. या वेळी उत्तम पाटील, नितीन पाटील, अशोकराव जाधव, संभाजी पोवार उपस्थित होते. सदाशिव कुलकर्णी यांनी स्वागत केले. दीपक पाटील यांनी आभार मानले.
---------
चौकट
शेतकरीविरोधी कायद्यांचा क्रूर वापर
हबीब म्हणाले, की काँग्रेसने केलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकमुखी मोदी सरकारला पाठिंबा दिला. परंतु, मोदी सरकारने या कायद्यांना हात लावला नाही, तर त्याचा क्रूरपणे वापर केला. यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांचे मारेकरी आहे.